टेमघर जलशुध्दीकरण केंद्रातून ठाणेकरांना अशुध्द पाण्याचा पुरवठा होत असल्याचं उघड

टेमघर जलशुद्धीकरणातील ही यंत्रणा येत्या आठ दिवसात जर पालिकेने सुधारली नाही. तर पालिका प्रशासनावर ‘पाणी फेको’ आंदोलन करण्यात येईल असा इशारा विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी दिला आहे. पालिकेच्या टेमघर जलशुद्धीकरण केंद्रात स्टेमकडून घेतलेल्या पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करण्यात येत असते. मात्र, या शुद्धीकरण केंद्राची पुरती वाताहत झालेली आहे. या केंद्रामधील शुद्धीकरणाची 22 पैकी 11 युनिट आणि क्लोरीनेशनचा एक प्लांट बंदावस्थेत असून ज्या ठिकाणी वाळूमार्फत पाणी गाळमुक्त करण्यात येत असते; त्याच ठिकाणी मोठ्याप्रमाणात झाडे उगवली आहेत. त्यामुळे ठाणेकरांना चक्क अशुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचा पर्दाफाश विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी टेमघर जलशुद्धीकरण केंद्रात जाऊन केला आहे. विशेष म्हणजे, या जलशुद्धीकरण केंद्राचे कार्यकारी अभियंता पांड्ये हे या ठिकाणी अनेक दिवस फिरकलेच नसल्याचेही उघडकीस आले. विरोधी पक्षनेते शानू पठाण यांना भिवंडी नजीकच्या टेमघर येथील जलशुद्धीकरण केंद्राची वाताहत झाली असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी या ठिकाणी अचानक पाहणी केली. ठामपाच्या इतिहासात विरोधी पक्षनेत्यांनी अशा पद्धतीने दौरा करुन जलशुद्धीकरणाच्या कारभाराचा पर्दाफाश करण्याची ही पहिलीच वेळ आहे.या पाहणीमध्ये जलशुद्धीकरण केंद्राचे ‘अशुद्धीकरण’ झाले असल्याचे निदर्शनास आले. स्टेमकडून ठाणे महानगर पालिका साधारणपणे 120 दशलक्ष लिटर्स पाणी घेऊन ते साधारणपणे आठ टप्प्यांमध्ये पाण्याचे शुद्धीकरण करते. मात्र, या ठिकाणी पाण्याचे शुद्धीकरण होण्याऐवजी अशुद्ध असलेले पाणीच ठाणेकरांना वितरीत केले जात असल्याचे दिसून आले. स्टेमकडून उचललेले पाणी शुद्ध करण्यासाठी साधारणपणे 22 युनिट आहेत. त्यापैकी 11 युनिट गेल्या सहा महिन्यांपासून बंदच आहेत. मात्र, त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. पाण्यातील राळारोडा गाळून घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या छोट्या छोट्या ओढ्यासदृश्य पन्हाळ्यांमध्ये वाळू टाकण्यात येत असते. ही वाळू ठराविक कालावधीनंतर बदलावी लागते. मात्र, ती बदलण्यात आलेली नसल्याने त्या ठिकाणी चक्क गवत उगवलं आहे. स्टेमकडून पाणी घेतल्यानंतर त्याचे वितरण करण्याआधी दोनवेळा क्लोरीनचा डोस देण्यात येत असतो. मात्र, शुद्धीकरणानंतर पाण्याचे क्लोरीनेशन करण्याची प्रक्रियाच गेल्या एक वर्षापासून बंद असल्याचे तसेच क्लोरीन सिलिंडरची वाहतूक करण्यासाठी यंत्रणाच नसल्याचे कर्मचार्‍यांनीच शानू पठाण यांना सांगितले. या शुद्धीकरण केंद्राची पाहणी करताना अनेक ठिकाणी रिकाम्या दारुच्या बाटल्यांचा खच पडलेला असल्याचेही दिसून आले. ज्या ठिकाणी पाणी शुद्धीकरण केले जात आहे. त्याच ठिकाणी रिकाम्या बाटल्यांचा खच दिसून आला. देखभालीसाठी नियुक्त केलेला ठेकेदार, पालिकेचे अधिकारी यांच्यामाध्यमातून ठाणेकरांना शुद्ध पाणी देण्याऐवजी अशुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. लाखो ठाणेकर शुद्ध पाण्यासाठी पाणीपट्टी भरत असताना त्यांना अशुद्ध पाणी पाजण्याचे पाप ठाणे पालिका प्रशासन करीत आहे. टेमघर जलशुद्धीकरणातील ही यंत्रणा येत्या आठ दिवसात जर पालिकेने सुधारली नाही. तर पालिका प्रशासनावर ‘पाणी फेको’ आंदोलन करण्यात येईल. असा इशारा विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी दिला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading