100 टक्के मतदान करण्याचा ठाणे शहरातील चर्चच्या सदस्यांचा निर्धार

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. ठाणे जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी ठाण्यातील अवर लेडी ऑफ मर्सी चर्च आणि लेडी फातिमा चर्चमध्ये जमलेल्या नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच चर्चच्या फादरनी सुद्धा चर्चच्या सदस्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. काल माजीवाडा येथील अवर लेडी फातिमा चर्च तसेच पोखरण रोड येथील अवर लेडी ऑफ मर्सी चर्चमध्ये जमलेल्या सुमारे पाच हजाराहून अधिक नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन स्विपच्या टीमने तसेच चर्चच्या फादरनी केले. पोखरण रोड क्रमांक दोन येथील अवर लेडी ऑफ मर्सी चर्चचे फादर जॉन आल्मेडा यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे पाच हजार सदस्यांनी निवडणूकीत मतदान करण्याची शपथ चर्चमध्ये घेतली. तसेच येत्या काही दिवसांत चर्चचे सदस्य मतदान वाढविण्यासाठी जनजागृती करणार आहेत. माजिवडा परिसरातील अवर लेडी ऑफ फातिमा चर्च मध्ये प्रार्थनेसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. यामध्ये युवावर्ग, स्त्रिया, पुरुष, दिव्यांग नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश होता. या सर्वांना स्विप टिमच्या वतीने मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. अवर लेडी ऑफ फातिमा चर्चमध्ये मतदान करा असे आम्हाला सांगण्यासाठी स्वतः प्रशासन आले आहे. मतदान जनजागृती ही खूप महत्वाची आहे. आमच्या समाजातील काही सदस्य परदेशात राहत असल्याने आणि येथे राहणारे बरेच लोक मतदानासाठी येत नसल्यामुळे मतदान टक्केवारी कमी आहे. यावर्षी सर्व सदस्यांनी मतदान करावे, यासाठी विशेष प्रयत्न करणार असून आम्ही पूर्ण उत्साहाने मतदान करणार आहोत आणि आमच्या सर्व बांधवाना मतदान करण्यास प्रवृत्त करणार आहोत, असे चर्चच्या फादर यांनी यावेळी सांगितले. ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी जनजागृतीविषयक कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading