लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केली एकमेकांवर रंगांची उधळण

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भारतीय जनता पक्षामध्ये युती झाली असली तरी या युतीचा रंग निवडणुक निकालाच्या वेळेस स्पष्ट होणार आहे. ठाण्यामध्ये शिवसेना-भारतीय जनता पक्ष यांच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन नसल्याचे प्रसंग फारसे दिसले नसले तरी राजन विचारे यांना उमेदवारी देण्यावरून भारतीय जनता पक्षाच्या नेते-कार्यकर्त्यांनी उघड भूमिका घेतली होती. त्यानंतर विचारे यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेते-कार्यकर्त्यांची भेट घेण्याचा सपाटा सुरू केला. काल धुळवडीच्या दरम्यान शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर रंग उधळला. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर यांनी एकमेकांना गुलाल फासून धुळवड साजरी केली. यापूर्वी ही सर्व नेतेमंडळी फारशी एकत्र कधी दिसली नाहीत. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रथमच हे नेते एकत्र धुळवड खेळताना पहायला मिळाले. यावेळी पालकमंत्री, खासदारांनी आमदार संजय केळकर यांना रंग लावला तर आमदार केळकर यांनीही खासदार तसंच पालकमंत्र्यांना रंग लावत धुळवड साजरी केली. शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी एकत्रितपणे साज-या केलेल्या धुळवडीचे रंग निवडणुकीतही दिसणार ना याकडे राजकीय निरिक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading