संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता ठाणे महापालिका क्षेत्रात सर्व सर्व्हिस सेंटरमधील वाहने धुणे आणि इतर साफसफाईची कामे करण्यास मनाई

ठाणे महापालिकेनं संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता पाण्याच्या अनिर्बंध वापरावर निर्बंध लावले आहेत. सध्या तीव्र उन्हाळा सुरू असल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व शहरे, गावे यांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत आहे. त्याचबरोबर, ठाणे महापालिका क्षेत्रातील विहिरी आणि कूप नलिका यांच्यातील पाण्याची पातळीही वेगाने कमी होत आहे. त्यामुळे भविष्यात तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाणी बचतीची आवश्यकता आहे. म्हणून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व सर्व्हिस सेंटरमधील वाहने धुणे, पाण्याने साफसफाई करणे यास मनाई करण्यात आली आहे. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार, ठाणे महापालिका क्षेत्रात, १० जून२०२४ पर्यंत दूचाकी, तीन चाकी, चारचाकी वाहने, मोठी वाहने धुणे, तसेच पाण्याने साफसफाई करणे या कामांवर पालिकेने निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व्हिस सेंटरवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलमांनुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनीही दक्षता घ्यावी. त्याचबरोबर, नागरिकांनीही पाण्याचा वापर काटकसरीने करून पाणी बचत करावी, असे आवाहन महापालिकेने केले. शक्यतो दररोज गाड्या धुतल्या जावू नयेत. त्याएेवजी बोअरवेलच्या पाण्याने ओल्या केलेल्या कपड्याने गाड्या पुसाव्यात अशी सूचना महापालिकेने केली आहे. नागरिकांनी अत्यंत काटकसरीने पाण्याचा वापर करावा. अंगणात पाणी मारू नये. नळ सुरू ठेऊन कपडे धुणे, भांडी घासणे, दात घासणे, दाढी करणे टाळावे. घरातील नळांची गळती तातडीने दुरुस्त करावी. सोसायटीतील गळकी टाकी, पाईप, व्हॉल्व्ह दुरुस्त करावेत. इमारतींच्या छतावरील टाकी ओव्हरफ्लो होवू नये याची दक्षता घ्यावी अन्यथा पाणी पुरवठा खंडीत करण्याचा इशारा महापालिकेनं दिला आहे. आंघोळीसाठी शॉवर, बाथटबचा वापर करू नये. इमारती / सोसायटी / संकुलांमधील तरण तलावासाठी पिण्याचे पाणी वापरू नये. पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा अत्यल्प असल्याने एक जबाबदार नागरिक म्हणून पाण्याचा अपव्यय टाळून पाणी वाचवण्याचं आवाहन महापालिकेने केले आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading