राजन विचारे हे दिघेंचे नकली शिष्य आहेत तर नरेश म्हस्के असली शिष्य – मुख्यमंत्री

धर्मवीर आनंद दिघेची लोकप्रियता वाढत होती. यशाच्या शिखरावर असताना त्यांना त्रास देण्याचे काम त्यांनी केले. इतकेच काय त्यांचे जिल्हाध्यक्षपद काढून घेण्याचे कारस्थान सुरु होते. दिघेंचे आयुष्य आश्रमात गेले मात्र जेव्हा निधन झाले तेव्हा दिघेंची कुठे प्रॉप्रटी आहे असा पहिला प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला होता. दिघे यांच्या प्रॉपर्टीवर उद्धव ठाकरेंचा डोळा होता, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आयोजित महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. दिघेंचे जिल्हाध्यक्षपद काढले तर ठाणे जिल्ह्यात पक्षच उरणार नाही, असे जेव्हा त्यांना समजले तेव्हा थांबले. उत्तराधिकारी म्हणून राज ठाकरेंचे नाव सुचवले म्हणून दिघेंना त्रास देण्यात आला असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. धर्मवीर आनंद दिघे यांनी आपल्याला आयुष्यात उभे केले. तुला समाजासाठी काम करायचेय हे दिघेंचे शब्द आजही कानात घुमतात. धर्मवीर सिनेमात यासंदर्भात राजन विचारे यांनी राजीनामा देऊ केल्याचा दाखवलेला प्रसंग काल्पनिक आहे. प्रत्यक्षात त्यावेळी राजन विचारे राजीनामा देण्यास तयार नव्हते. जेव्हा दिघेंनी त्यांच्या भाषेत समजावले तेव्हा विचारे यांनी राजीनामा दिला. आता खरी वस्तुस्थिती सिनेमाच्या दुसऱ्या भागात समोर येईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तुम्ही २०१९ मध्ये जनतेशी बेईमानी केलीत. बाळासाहेबांचे विचार सोडून कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात. देवेंद्र फडणवीसांनी ५० फोन केले पण तुम्ही एकही फोन उचलला नाही, उद्धव ठाकरेंचा कृतघ्नपणा यातून दिसून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षात एकही सुट्टी घेतली नाही. महायुतीकडे नेशन फर्स्ट आहे तर महाविकास आघाडीकडे कट करप्शन कमिशन आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. आपण फार प्रेमळ आहोत पण ठरवले तर करेक्ट कार्यक्रम करतो, असा इशारा त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. आपण कार्यकर्ता म्हणून प्रचाराला जातो, मुख्यमंत्री म्हणून नाही. जिथे जातो तिथे विरोधकांचा बाजार उठून जातो अशी टीका त्यांनी केली. नरेश म्हस्के हेच आनंद दिघेंचे खरे शिष्य आहेत. ठाणे मतदार संघाबाबत आमच्या भावना जोडलेला आहे. दिघेंचा बालेकिल्ला आहे. बाळासाहेबांचे विचार सोडलेल्यांसोबत गेलेले राजन विचारे हे दिघेंचे नकली शिष्य आहेत तर नरेश म्हस्के असली शिष्य आहेत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading