महापालिकेच्या आर्थिक स्थितीबाबत श्वेतपत्रिका काढण्याची नगरसेवक नारायण पवार यांची मागणी

ठाणे महापालिकेवरील कर्जाचा बोजा लक्षात घेऊन आर्थिक स्थितीबद्दल श्वेतपत्रिका तयार करावी आणि ठाणेकरांच्या माथी मारलेले सूटाबुटातील अनावश्यक प्रकल्प थांबवून काटकसरीचे उपाय योजावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. ठाणे महापालिकेवर ३ हजार कोटी रूपयांचा बोजा आहे. गेल्या काही वर्षात महापालिकेकडून विविध मोठे प्रकल्प जाहीर करण्यात आले आहेत. सामान्य ठाणेकराची गरजेएवढ्या आणि आवश्यक सुविधांची अपेक्षा असताना महापालिका प्रशासनाकडून स्मार्ट ठाण्याच्या नावाखाली सुटाबूटातील प्रकल्प लादले गेले आहेत. या प्रकल्पांचा खर्च परवडण्याजोगा नसल्याचं नारायण पवार यांचं म्हणणं आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असतानाही या प्रकल्पांवर कोट्यावधी रूपयांचा खर्च सुरू आहे. या प्रकल्पांचा आढावा घेण्याची गरज असून आगामी काळात आर्थिक स्थिती खालावल्यास महापालिका कर्मचा-यांना पगार देण्यासही पैसे शिल्लक राहणार नसल्याची भीती नारायण पवार यांनी व्यक्त केली आहे. ठाणे महापालिकेचे नेमके उत्पन्न किती, दरमहा खर्च किती, बँका आणि इतर वित्तसंस्थांकडून घेतलेले कर्ज, कर्जाच्या अटी, कर्ज परतफेडीचा कालावधी, दरमहा कर्जापोटी जाणारा हफ्ता यासाठी श्वेतपत्रिका जारी करावी अशी मागणी नारायण पवार यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading