महापालिका आयुक्तांच्या बंगल्यावर गेलेल्या २०० हून अधिक फाईल्सच्या संशयास्पद कारभाराची नगरसेवक नारायण पवार यांची चौकशीची मागणी

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे रजेवर गेल्यानंतर शहर विकास विभागातून आयुक्तांच्या बंगल्यावर २०० हून अधिक फाईल्स पाठवण्यात आल्या. त्या फाईल्सवर स्वाक्ष-या झाल्याचा संशय असून या संशयास्पद कारभाराची चौकशी करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे. महापालिका आयुक्तांनी रजेसाठी अर्ज केला असून जोपर्यंत आपली दुसरीकडे बदली होत नाही तोपर्यंत सुट्टी द्यावी असा उल्लेख केल्याची चर्चा होती. महापालिका आयुक्तांनी दुस-या कोणत्याही अधिका-याकडे आपल्या पदाची सूत्रं सोपवलेली नसल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जातं. मात्र शहर विकास विभागातून २९ फेब्रुवारीपासून २०० हून अधिक फाईल्स आयुक्तांच्या बंगल्यावर नेल्या जात असल्याचं सांगितलं जातं. पालिका आयुक्तांची रजा मंजूर झाली असल्यास त्यांनी रजेच्या कालावधीत केलेल्या स्वाक्ष-या नियमबाह्य ठरतात असं नारायण पवार यांचं म्हणणं आहे. शहर विकास विभागामधील काही प्रकरणांमध्ये सीबीआय चौकशी सुरू असून न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत. तर काही प्रकरणांमध्ये मंत्रालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्तांकडून या फाईल्स मागवल्या जाण्याचा प्रकार संशयास्पद आहे. शहर विकास विभागातील आवक जावक नोदीचा तपशील तपासावा, महापालिका मुख्यालय आणि आयुक्त निवासस्थान परिसरातील सीसीटीव्ही फूटेज घेऊन चौकशी करावी तसंच फाईल्स घेऊन जाणा-या अधिकारी-कर्मचा-यांची चौकशी करून कडक कारवाई करावी अशी मागणी नारायण पवार यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading