नारायण पवार यांच्या प्रयत्नांना यश, जाहिरात हक्काची सर्वच कंत्राटे रद्द करा

ठाणे शहरातील नागरिकांसाठी भाडेतत्वावर सायकलींच्या बदल्यात कोट्यवधी रुपयांचे जाहिरातीचे हक्क पदरात पाडून घेणाऱ्या कंत्राटदाराचे हक्क रद्द करण्यासाठी महापालिकेने पहिले पाऊल टाकले आहे. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांच्या सातत्याच्या प्रयत्नांनंतर १९ मार्च रोजी होणाऱ्या महासभेपुढे महापालिका प्रशासनाने कंत्राटदाराला दिलेल्या हक्कांबाबत विचार करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. तर सायकल कंत्राटाबरोबरच महापालिकेने जाहिरातीच्या हक्काच्या बदल्यात केलेले अन्य करारही रद्द करण्याची मागणी नारायण पवार यांनी केली आहे. ठाणे शहर `स्मार्ट सिटी’ होणार असल्याची चर्चा घडवून, मे. न्यू. एज. मिडीया पार्टनर प्रा. लि. या कंपनीला शहरातील महत्वाच्या ५० ठिकाणी स्टॅण्डसाठी मोफत जागा देण्यात आली. त्याचबरोबर खेवरा सर्कल येथील महापालिकेच्या इमारतीतील दोन मजले मोफत दिले गेले. तर सायकल स्टॅण्डवर होणाऱ्या जाहिरातीसाठी महापालिकेकडून कोणताही कर आकारला जात नाही. त्याबदल्यात या कंपनीने सुमारे अडीच वर्षांपूर्वी केवळ ५०० सायकली दिल्या. या सायकलची किंमत केवळ १७ लाख ५० हजार रुपये होती. इतकेच नव्हे तर महासभेत ठराव एका कंपनीच्या नावे, अन् करार दुसऱ्या कंपनीच्या नावे, अशी किमयाही अधिकाऱ्यांनी साधली होती. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी असा बुद्धी गहाण ठेवणारा करार केला होता. त्याचबरोबर तत्कालीन आयुक्तांनी महासभेची दिशाभूल करून अवमानही केला होता, याकडे पवार यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये लक्ष वेधले. तसेच महापालिकेची सध्याची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन कंत्राट रद्द करून जाहिरात फलक ताब्यात घेऊन निविदा काढाव्यात. त्यातून महापालिकेचे उत्पन्न वाढू शकेल, अशी मागणीही केली होती. अखेर त्यांच्या मागणीवर महापालिका प्रशासनाने पहिले पाऊल टाकले आहे. येत्या १९ मार्च रोजी होणाऱ्या महासभेपुढे महापालिका प्रशासनाने सायकल कंत्राटदाराला दिलेल्या हक्कांबाबत विचार करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावावर महासभेत चर्चा केली जाणार आहे. त्यात संबंधित कंत्राट रद्द करण्याचा आग्रह धरण्यात येईल असे नारायण पवार यांनी स्पष्ट केले. सायकल प्रकल्पांप्रमाणेच ५० चौक आणि परिसराच्या सुशोभिकरणातून ७५ हजार चौरस फूटांचे जाहिरात हक्क, शौचालये उभारण्याच्या बदल्यात सुवर्णा फाइब्रोटेक आणि तिर्था अॅडव्हर्टायझिंग कंपनीला जाहिरातींचे हक्क, लाल बहादूर शास्त्री मार्गावरील तीन उड्डाणपुलाखालील जागेत व्हर्टिकल गार्डन आणि सुशोभिकरणाच्या बदल्यात जाहिरातींचे हक्क, १५ मोबाईल व्हॅनवरील जाहिरातीचे हक्क आदींमधून मोठ्या प्रमाणावर महापालिकेचे नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटेही रद्द करण्याबाबत प्रस्ताव आणावेत अशी मागणी नारायण पवार यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading