जांभळीनाका होलसेल किराणा माल दुकानदारांवर निर्बंध – सोशल डिस्टान्स न पाळल्यामुळे दुरध्वनीवरुन घ्यावी लागणार ऑर्डर

जांभळी नाका येथील मुख्य भाजीपाला मार्केट बंद करण्याबरोबरच तेथील होलसेल किराणामाल दुकानदार सोशल ‍डिस्टन्स पाळत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी आज येथील दुकानदारांना थेट विक्री करण्यास मज्जाव करण्याचा निर्णय घेतला. तर दूरध्वनीवरुन मालाची ऑर्डर घेवून त्यानुसार डिलीव्हरी करण्याचा पर्याय त्यांना उपलब्ध करुन दिला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी किराणामाल दुकानदारांनी सोशल डिस्टन्स नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करुन महापालिका आयुक्तांनी नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदारांची नोंदणी रद्द करण्याचा इशाराही दिला आहे. या निर्णयामुळे आता जांभळीनाका किराणा होलसेल मार्केट दुकानांत ग्राहकांना थेट सामान विक्री करण्यावर निर्बंध घालण्यात आले असून दूरध्वनीवरुन अथवा ऑनलाईन पध्दतीने माल विकण्यास परवानगी असणार आहे. घाऊक विक्रेत्यांना दूरध्वनी किंवा ऑनलाईन नोंदणी घेवूनच त्यांचा माल किरकोळ विक्रेत्याच्या दुकानात थेट पोहचवावा लागणार आहे. घाऊक विक्रेत्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये फुटकळ खरेदी ग्राहकांना विक्री करता येणार नसून सर्व ‍विक्री ही ऑनलाईन तसंच दूरध्वनीवरुन ऑर्डर घेवूनच करावी लागणार आहे. दरम्यान कोणत्याही परिस्थितीत दुकानावर गर्दी होणार नाही याची काळजी दुकानदारांनी घ्यावी असे स्पष्ट करुन एकाच वेळी 4 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. सोशल डिस्टन्सींग पाळण्याची जबाबदारी दुकानदारांचीही असून त्यांचे पालन न करणाऱ्या दुकानदारांवर आवश्यक ती कार्यवाही करुन गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच कायदेशीर कार्यवाही करुन दुकानांची नोंदणी रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading