तज्ञ डॉक्टरांकडून ऑनलाईन व्हिडिओ कॉल द्वारे तपासणीची मोफत सुविधा

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना तत्पर आरोग्यसेवा पुरवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत असून आता शहरातील खासगी तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून नागरिकांसाठी स्वतःच्या घरातून थेट व्हिडिओ कॉल द्वारे डॉक्टरांशी संपर्क साधून ऑनलाईन तपासणी आणि उपचार करण्याची सुविधा सुरु करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन, ठाणेच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत असून अशा प्रकारचा भारतातील हा नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. डीजी ठाणे प्रणालीच्या माध्यमातून ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली असून www.touchbase.live ह्या वेबसाईट वर जाऊन थेट व्हिडिओ कॉल करून नागरिक यादीमधील उपलब्ध तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करून घेऊ शकतात. नागरिक आपल्या स्मार्ट मोबाईल फोन किंवा लॅपटॉप वरून डॉक्टरांशी संपर्क साधू शकतात. ठाण्यातील तज्ञ डॉक्टरांकडून ही सेवा पूर्णत: मोफत पुरवली जाणार आहे.
भारतात हा उपक्रम सर्वात प्रथम राबवणारी ठाणे महापालिका प्रथम महापालिका ठरली आहे.
सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे सर्व शासकीय तसेच महापालिकेच्या आरोग्य आणि वैद्यकीय सेवेमध्ये काम करणाऱ्या मनुष्यबळावर मोठा ताण आला आहे, या नवीन सुविधेमुळे घर बसल्या थेट खासगी क्षेत्रातील डॉक्टरांशी संवाद साधून उपचार करून घेता येणार असल्याने ही सुविधा फारच मोलाची ठरणार आहे. सध्या या सुविधेतंर्गत सुमारे 40 डॉक्टर्स उपलब्ध झाले असून अजूनही सेवा देण्यासाठी डॉक्टर्स नोंदणी करीत आहेत. ह्या सुविधेमुळे डॉक्टर्स पेशंटला स्क्रीन वर बघू शकतात, त्यांच्याशी संवाद साधू शकतात आणि कोणती औषधे घ्यायची आहेत यासाठी ऑनलाईन प्रिस्क्रिप्शन देखील देऊ शकतात. या उपक्रमामुळे सद्यस्थितीत महत्त्वाचे ठरणारे सोशल डिस्टंसिंग राखलं जाईल आणि रुग्णांबरोबरच डॉक्टरांचे आरोग्य देखील सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे. फाइंड्याबिलिटी सायन्सेस या कंपनीने हि सेवा मोफत उपलब्ध करून दिली आहे. ३० जून पर्यंत हि सेवा मोफत असून सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त डॉक्टरांनी देखील पुढे येऊन या वेब साईटवर नोंदणी करून दिवसातील किमान १-२ तास ह्या सेवेसाठी द्यावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading