गडकरी रंगायतन उपहारगृहाचा वापर पत्रकार परिषदेसाठी करू देण्यास बंदी घातल्याच्या निषेधार्थ ठाणे मतदाता जागरण अभियानातर्फे निदर्शनं

ठाणे महापालिकेच्या उपायुक्तांनी गडकरी रंगायतन उपहारगृहाचा वापर पत्रकार परिषदेसाठी करू देण्यास बंदी घातल्याच्या निषेधार्थ ठाणे मतदाता जागरण अभियानातर्फे आज निदर्शनं करण्यात आली.ठाण्यामध्ये सार्वजनिक संस्थांना पत्रकार परिषदा घ्यायच्या असल्यास योग्य जागा उपलब्ध होत नाही. ठाण्यातील गडकरी रंगायतनचा कट्टा हा अशा गोष्टींसाठी उपयोगी ठरतो. पण महापालिका कारभारावर टीका होते म्हणून महापालिकेनं गडकरी कट्ट्यावर पत्रकार परिषदा घेण्यास बंदी घातली. त्यामुळं सामाजिक संस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेच्या कोणत्याही स्थावर मालमत्तेवर अथवा कारभारावर टीका करण्याचा नागरिकांना घटनादत्त अधिकार आहे. पालिकेच्या सार्वजनिक सेवेत म्हणजेच जनतेचे सेवक असलेल्या अधिका-यानं एका आदेशानं हे अधिकार काढून घेणं घटनेच्या विरोधात आहे. महापालिकेचा कारभार हा पारदर्शी, लोकाभिमुख नाही त्यामुळं त्यावर टीका होणारच, पण टीका सहन होत नाही म्हणून अशी बंदी घालणं पूर्णत: निषेधार्ह असल्याचं अभियानाचं म्हणणं आहे. याबाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनीही आपली राजकीय भूमिका स्पष्ट करावी अशी अभियानाची मागणी आहे. स्थावर मालमत्ता विभागाचे उपायुक्त मनिष जोशी यांनी ठाणेकरांची माफी मागावी आणि आपले आदेश मागे घ्यावेत अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानानं केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading