आंबा विकण्यासाठी पुन्हा स्टॉल उभारू न दिल्यास पालिकेच्या दारातच आंबा विक्री केंद्र सुरू करू – आनंद परांजपे

ठाणे महापालिका प्रशासनानं सत्ताधा-यांच्या हातचं बाहुलं होऊ नये, गोरगरिब शेतक-यांनी उत्पादित केलेला आंबा विकण्यासाठी पुन्हा स्टॉल उभारू न दिल्यास सर्व आंबा विक्रेत्यांना घेऊन पालिकेच्या दारातच आंबा विक्री केंद्र सुरू करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे. विष्णूनगर येथील पदपथावर उभारलेल्या आंबा विक्री केंद्रास भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी विरोध केल्यानंतर पालिकेनं काल हे विक्री केंद्र बंद केलं. त्या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत परांजपे यांनी हा इशारा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शेतक-यांच्या हितासाठी लढत आहे. त्यामुळं शेतक-यांना केलेला विरोध आपण सहन करणार नसून राष्ट्रवादीचे नगरसेवक त्यांच्या संरक्षणासाठी सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या ठाण्यात आंब्यावरून वातावरण गरम झालं आहे. शहरात भीषण पाणी टंचाई आहे. अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आ वासून उभा आहे. नालेसफाईची कामं रेंगाळली आहेत. मेट्रोमुळं शहरात वाहतूक कोंडी होत आहे. यासारखे अनेक विषय असतानाही भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि शहर अध्यक्ष हे शेतक-यांच्या विरोधात राजकारण करत आहेत. शिवसेनेच्या साथीनं सत्ता उपभोगणा-या भारतीय जनता पक्षाला या शहरात राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करता आलेली नाही. अशा स्थितीमध्ये शेतकरी आपला शेतमाल थेट विक्री करत असेल तर पालिका प्रशासनानं त्यावर कारवाई करणं चुकीचं असल्याचं परांजपे यांनी सांगितलं. ठाण्यातील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी ठाण्याच्या विकासाचं राजकारण करावं, शेतक-यांची अडवणूक करू नये, ठाणे महापालिकेनंही माणुसकीच्या नात्यानं शेतक-यांवर कारवाई करू नये अन्यथा या शेतक-यांना घेऊन आम्ही पालिकेच्या दारात आंबा विक्रीचे स्टॉल लावू असा इशाराही आनंद परांजपे यांनी यावेळी दिला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading