हरियाना सरकारप्रमाणेच राज्यातील आरोग्य सेवेतील कर्मचा-यांचं वेतन दुप्पट करण्याची आमदार प्रताप सरनाईकांची मागणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शासकीय तसंच अशासकीय सेवेतील डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य सेवेतील कर्मचा-यांना हरियानाप्रमाणेच दुप्पट वेतन देण्याबरोबरच राज्यातील पोलीसांना वेळेवर वेतन कसं मिळेल याची दक्षता घेऊन त्यांना ५० लाखांचं विमा संरक्षण देण्याची मागणी ठाण्याचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांना सरनाईक यांनी पाठवलेल्या निवेदनात ही मागणी केली आहे. सध्या कोरोनानं हाहा:कार माजवला असून राज्यातील डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवेचे कर्मचारी कोरोनाग्रस्त रूग्णांची सेवा करताना दिसत आहेत. देशापेक्षा राज्याची स्थिती यापेक्षा बिकट आहे. मुंबईतील अनेक नामवंत रूग्णालयं कोरोनाच्या लागणीमुळे बंद करण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत ही सर्व मंडळी अहोरात्र नि:स्वार्थ सेवा करत आहेत. अशा मंडळींच्या मागे ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. हरियानाने ज्याप्रमाणे या कर्मचा-यांचं वेतन दुप्पट केलं तसंच राज्य सरकारनंही या कालावधीमध्ये वेतन दुप्पट करावं अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली आहे. यासाठी निधीची आवश्यकता भासल्यास आमदारांच्या वेतनात करण्यात आलेली कपात ३० टक्क्यांवरून ५० टक्के करावी लागली तरी चालेल पण अर्थमंत्री या नात्यानं याबाबत त्वरीत निर्णय घेण्याची मागणी प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading