स्वमालकीच्या जागेवर महापालिका बसविणार तब्बल २० वर्षाने फलक

बिल्डरकडून २० वर्षांपूर्वी ताब्यात घेतलेल्या तब्बल ९ हजार ५१० चौरस मीटर जागेवर आता महापालिकेकडून फलक लावण्याबरोबरच कुंपण घालण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांच्या पाठपुराव्यानंतर महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी आठ दिवसांत फलक आणि कुंपण घालण्याचे आश्वासन दिले. या जागेवर खेळाच्या मैदानाचे आरक्षण असल्यामुळे, घोडबंदरवासियांना नवे प्रशस्त मैदान उपलब्ध होणार आहे.
कोलशेत येथील सेक्टर ५ मधील महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यातील आरक्षीत असलेल्या खेळाच्या मैदानासाठी ९ हजार ५१० चौरस मीटर क्षेत्र महापालिकेच्या ताब्यात घेण्यात आले होते. २००२ पासून या जागेच्या सातबारा उताऱ्यावर महापालिकेच्या नावाची नोंद झाली आहे. मात्र या जागेला कंपाऊंड आणि खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असल्याचा फलक लावण्यात हेतुपुरस्सर दिरंगाई केली जात आहे. या विषयावर नगरसेविका मणेरा यांनी महासभेत प्रशासनाला प्रश्न विचारला होता. त्यावेळी लेखी उत्तरात संबंधित मैदानाला कंपाऊंड आणि तेथे फलक लावण्याची माहिती देण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात मैदानाच्या ठिकाणी फलक वा कुंपण उभारण्यात आले नव्हते. महापालिका प्रशासनातील काही अधिकाऱ्यांकडून हेतुपुरस्सर खोटी माहिती देऊन दिशाभूल केली जात होती. या संदर्भात अर्चना मणेरा यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्याबाबत काहीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आयुक्तांच्या दालनाबाहेर धरणं आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी तातडीने मैदानावर मार्किंग करण्याचं आश्वासन दिले. त्याचबरोबर येत्या आठ दिवसात खेळाच्या मैदानाचा फलक लावून मैदानाला कुंपण घालणार असल्याचही आश्वासन दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading