मतदार नोंदणीस २ दिवसांची मुदतवाढ

निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा कालावधी वाढविण्यात आला असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आता पुन्हा ५ डिसेंबर पर्यंत पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी मिळाली आहे. निवडणूक आयोगातर्फे १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. त्या आधारावर ५ जानेवारी २०२२ रोजी विधानसभा मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्याच मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत. त्याबाबत विविध माध्यमातून जनजागृतीही करण्यात आली आहे; परंतु या आगामी निवडणुकांची मोठी संख्या लक्षात घेवून संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमास मुदतवाढ देण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाने केली होती. त्यानुसार ५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमास मुदतवाढ मिळाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आता पुन्हा १ जानेवारी, २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांना ५ डिसेंबर पर्यंत मतदार यादीत नावे नोंदविण्याची संधी प्राप्त झाली आहे. ऑनलाईन पद्धतीने www.nvsp.in या संकेतस्थळावर नाव नोंदविणे, नावाची पडताळणी करणे किंवा नावांतील, पत्त्यांतील तपशिलांत दुरुस्त्याही करता येतील. त्यासाठी विधानसभा मतदरसंघांच्या १ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांतील आपल्या नावांचीही खात्री करुन घ्यावी. नाव नसल्यास ते त्वरीत नोंदवून घ्यावे; तसेच विहित पद्धतीने मृत व्यक्तींची किंवा दुबार नावेदेखील वगळावीत असे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading