सेंट्रल पार्क ठाणेकरांचे कि विकासकाचे – मनसेने उपस्थित केला सवाल

ढोकाळी येथील सेंट्रल पार्क ३ वर्ष उलटूनही सर्वसामान्य ठाणेकरांना का उपलब्ध होऊ शकत नाही असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उपस्थित केला आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कन्स्ट्रक्शन टिडीआरच्या बदल्यात ढोकाळी येथील २० एकरचा भूखंड कल्पतरु या विकासकाला विकसित करण्यासाठी देण्यात आला होता. २०१७ मध्ये येथे सेंट्रल पार्क उभारण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते भुमीपुजनही करण्यात आले होते. परंतु आज तीन वर्षे उलटूनही हे सेंट्रल पार्क ठाणेकरांना उपलब्ध का झाले नाही असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष पुष्कराज विचारे यांनी उपस्थित केला आहे. ते ठाणेकरांना मिळणार आहे का? की विकासच्या घशात घातले जाणार आहे, याबाबत आता शंका निर्माण झाल्याचेही त्यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून व्यक्त केली आहे. या बाबत अपेक्षित उत्तरे न मिळाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून ढोकाळी भागात २० एकरवर सेंट्रल पार्क उभारण्याचे निश्चित करण्यात आले होते. या संदर्भातील प्रस्तावही २०१७ मध्ये झालेल्या महासभेत मंजुर करण्यात आला होता. या पार्कचे काम कन्स्ट्रक्शन टिडीआरच्या बदल्यात विकसित करण्यासाठी कल्पतरु या विकासकाला देण्यात आले होते. परंतु आजही हे काम पूर्ण का होऊ शकले नाही, असा सवाल विचारे यांनी केला आहे. विशेष म्हणजे गुगलवर सर्च केल्यास विकासकाने आपल्या गृहसंकुलातील फ्लॅटची विक्री करण्यासाठी हे पार्क गृहसंकुलाचाच एक भाग असल्याचे भासवून आपल्या प्लॉटचीही विक्री केल्याचेही दिसत आहे. त्यामुळे हे पार्क विकासक घशात घालणार याबाबत शंका निर्माण झाली आहे. याबाबत स्पष्ट उत्तर न मिळाल्यास या पार्कसाठी आंदोलन उभे करावे लागेल असा इशाराही पुष्कराज विचारे यांनी दिला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading