सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामांना दिलेली स्थगिती मुख्यमंत्र्यांनी उठविली

महाविकास आघाडीच्या काळामध्ये काही प्रकल्प चुकीच्या पध्दतीने राज्य शासनाकडे दाखल करण्यात आले असल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पांना स्थगिती दिली होती. परंतू, जी कामे नागरिकांच्या हिताची आहेत त्या सर्व कामांची स्थगिती मुख्यमंत्र्यांनी उठविली आहे. घोडबंदर राज्यमार्ग क्र.८४ हा रस्ता वळणा-वळणाचा घाट स्वरूपाचा आहे. या रस्त्यावरून मुंबई, भिवंडी-कल्याण तसेच नाशिककडे त्याचप्रमाणे वसई-विरार तसेच गुजरातकडे जाणा-या गाड्या ये-जा करीत असतात. या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतुक होत असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत असते. घोडबंदर रोडवरील भागामध्ये प्रचंड वेगाने झालेले नागरीकरण आणि वाढलेली वाहनांची संख्या यामुळे नागरिकांचे खूप हाल होत आहेत. हा रस्ता अनेक वर्षांपूर्वी डांबरीकरण केलेला रस्ता असून कालानुरूप जागोजागी खड्डे पडून रस्त्याची दुरावस्था झाली आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या साईडपट्या आणि आर.सी.सी. गटाराची देखील वाताहत झाली असून मोठ-मोठे कंटेनर पडून अपघात होत असतात,
हा रस्ता एम.एस.आर.डी.सी. कडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग झाला असल्या कारणाने नविन आणि शास्त्रशुध्द पध्दतीने हे रस्ते पी.डब्ल्यु.डी.ने बनवावे यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी पाठपुरावा केला असता या सर्व बांधकामांना स्थगिती आदेश होते. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नागरिकांच्या हितासाठी या कामांवरील स्थगिती उठविण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी स्थगिती उठवून जलद गतीने ही कामे सुरू करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
या मार्गावरील घाटभागांमध्ये रस्त्याची भौमितिक सुधारणा करणे, घाटभागामध्ये दोन ठिकाणी काँक्रीट पेव्हमेंट तयार करणे, या मार्गावरील कासारवडवली जंक्शनची सुधारणा करणे, अस्तित्वातील मार्गिकेचे काँक्रीट पेव्हमेंटमध्ये रूपांतर करणे, अंतिम मार्गिकेस काँक्रीट पेव्हर ब्लॉक लावणे आणि आरसीसी गटर्सची दुरूस्ती करणे, तसेच या रस्त्यांची वार्षिक देखभाल-दुरुस्ती करणे या कामांवरील स्थगिती उठविल्यामुळे निविदा प्रक्रिया पुर्ण होऊन या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. त्याचबरोबर गायमुख पासून पुर्ण घोडबंदर परिसरातील दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोडचे सिमेंट काँक्रीटीकरण करून त्यावर अनधिकृतरित्या होत असलेली पार्किंग बंद करावी अशी मागणी सरनाईक यांनी केली असता मुख्यमंत्र्यांनी एम.एम.आर.डी.ए.चे आयुक्त श्रीनिवासन यांना घोडबंदर रोड शेजारी असलेल्या दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडचे लवकरात लवकर सिमेंट काँक्रीटीकरण करण्याच्या सुचना केल्या. या सर्व कामांमुळे घोडबंदर रोडवरील वाहतुक कोंडीची समस्या काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading