ग्रामीण भागातील रस्ते चांगले करण्यावर भर – मुख्यमंत्री

राज्यातील तसेच शहरातील रस्ते चांगले असतील तर त्या राज्याचा, त्या शहराचा विकास होतो. त्यामुळे राज्य सरकारने मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते विकासाला प्राधान्य दिले आहे. यापुढील काळात ग्रामीण भागातील रस्ते चांगले करण्यावर भर देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील एमएमआरडीएच्या विविध रस्त्यांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातील एमएमआरडीएच्या वतीने ४४५ कोटीच्या २४ विविध रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन यावेळी झाले. राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी पायाभूत प्रकल्पांना गती देण्यात येत आहे. खड्डेमुक्त रस्ते हे या शासनाचे ध्येय आहे. चांगल्या दर्जाचे रस्ते असावे ही जनतेची अपेक्षा असते. त्यामुळे चांगल्या दर्जाचे रस्ते करण्यावर भर देत आहोत. राज्यात समृद्धी महामार्ग, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड, वसई विरार मल्टिमोडल रोड असे अनेक प्रकल्प राज्य शासनाने प्राधान्याने घेतले असून ते वेळेत पूर्ण करण्यात येणार आहेत. मुंबई पुणे महामार्गावर जगातील रुंदीने सर्वात मोठा टनेल आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात येत आहे. असे प्रकल्प राज्यासाठी कायापालट करणारे आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील मेट्रोच्या जाळ्यामुळे खासगी वाहने कमी होऊन प्रदूषण कमी होईल. एमएमआरडीए ला प्रकल्पासाठी साठ हजार कोटींच्या निधींसाठी परवानगी दिली आहे. कल्याण डोंबिवलीमधील नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी आणखी मोठ्या प्रकल्पाची कामे सुरू आहेत. शीळ फाटा रस्त्याला पर्यायाचा विचार करत आहोत. शिळ फाटा ते भिवंडी मल्टिलेव्हल रस्ता करणार आहोत. या शहराला आणखी चांगले करण्यासाठी जेजे करता येईल ते करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हे सरकार लोकांचे आहे. लोकांसाठी जे जे करता येईल ते करण्यासाठी आम्ही काम करू असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading