सहायक आयुक्तांना दमदाटी करणाऱ्यालाच ठाणे महापालिकेने केला गाळा बहाल

महापालिकेच्या सहायक आयुक्ताला दमदाटी केल्यानंतर तुरुंगात गेलेल्या फेरीवाल्यालाच महापालिकेने गावदेवी भाजी मंडईतील दुकान बेकायदेशीररित्या बहाल केले आहे.
महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने केलेला हा धक्कादायक गैरव्यवहार भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी उघड केला आहे. तसेच या प्रकरणी आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

गावदेवी मंडईत १५४ ओटले (गाळे) उभारण्यात येणार होते. मात्र, तेथे १५५ गाळे उभारले गेले. त्यातील ३६ क्रमांकाचा गाळा मिळालेल्या श्याम लोखंडे यांच्या भाजी विक्री व्यवसायाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे महानगरपालिकेच्या महासभेत ठराव करून लोखंडे यांना मंडईबाहेर गाळा बांधून देण्यात आला. त्यानंतर लोखंडे यांच्या ताब्यातील गाळा क्रमांक ३६ हा महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने बाबासाहेब खेडकर यांना बहाल केला. त्या प्रकारची नोंद स्थावर मालमत्ता विभागाच्या कागदपत्रात आढळली आहे. या बेकायदेशीर प्रकाराविरोधात भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी आवाज उठविला आहे.
मालमत्ता विभागाने गाळा दिलेल्या बाबासाहेब खेडकर याच्यावर महापालिकेच्या तत्कालीन सहायक आयुक्त प्रणाली घोंगे यांना दमदाटी केल्याचा आरोप आहे. त्याच्यावर वर्तक नगर पोलिस ठाण्यात एफआयआर क्रमांक ३६१/ २०२० नुसार ८ नोव्हेंबर २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याला १२ दिवसांची कोठडीही ठोठविण्यात आली होती. अशा आरोपी फेरीवाल्यालाच महापालिकेने गाळा दिल्याने स्थावर व मालमत्ता विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गावदेवी मार्केट मध्ये १५४ गाळेधारक होते. मात्र, १५५ गाळे बांधले गेले. या मार्केटमधील एक जास्त गाळा हा कोणत्याही रस्ते वा प्रकल्पात बाधित न झालेल्या धर्मेंद्र वाघुले यांना देण्यात आला. सध्या १५५ क्रमांकाचा हा गाळा धर्मेंद्र वाघुलेंच्याच ताब्यत आहे. त्याच्यावर स्थावर व मालमत्ता विभागाने मेहेरनजर का दाखवली, असा सवाल संजय वाघुले यांनी केला आहे.
काही वर्षांपूर्वी गावदेवी भाजी मंडईलगत असलेल्या एका गाळेधारकाने रस्त्यात ठेवलेला माल महापालिकेच्या उपायुक्ताने जप्त केला होता. त्यावेळी त्या गाळेधारकाने चक्क उपायुक्तालाच धक्काबुक्की केली होती. या प्रकाराची गंभीर दखल घेत तत्कालीन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी त्या गाळेधारकाचा गाळा असलेले संपूर्ण संकुलच जमीनदोस्त केले होते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की व फेरीवाल्यांची अरेरावी सहन करणार नाही, असा संदेश त्यांनी दिला होता. मात्र, आता सहायक आयुक्ताला दमदाटी करणाऱ्या समाजकंटक फेरीवाल्याला महापालिकेच्या मालकीचा गाळा देण्याचा पराक्रम स्थावर मालमत्ता विभागाने केला आहे, याबद्दल संजय वाघुले यांनी संताप व्यक्त केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading