सकल मराठा समाजाची सभागृह नेत्यांवर टीका

ठाणे महापालिकेचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी दिलेल्या आव्हानानुसार शिवशिल्पासाठी १० लाखांचा निधी मंजूर करून घेतला पण यानिमित्तानं शिवरायांच्या नावानं राजकारण करणा-यांची किंमत समस्त ठाणेकरांना दिसली अशा शब्दात सकल मराठा समाजानं परतवार केला आहे. महापालिका मुख्यालयाच्या बाहेर असलेल्या शिवशिल्पाच्या दुरूस्तीमध्ये दिरंगाई होत असल्याबद्दल निवेदन देण्यास गेलेल्या सकल मराठा समाजाच्या पदाधिका-यांना नरेश म्हस्के यांनी चिल्लर संबोधून धक्काबुक्की केली होती. त्यानंतर या पदाधिका-यांनी आयुक्तांची भेट घेऊन या शिवशिल्पासाठी निधी मंजूर करून घेतला. यासंदर्भात मराठा मोर्चाची भूमिका मांडण्यासाठी बोलवलेल्या पत्रकार परिषदेत कैलाश म्हापदी यांनी म्हस्के यांच्यावर टीका केली. शिवरायांचं नाव घेऊन सत्तेवर येणा-या या लोकांना पडझड झालेलं शिवशिल्प दिसत नाही हे दुर्दैव आहे. प्रशासनाकडून काम करून घेणं हे सत्ताधा-यांचं कर्तव्य असतं. मात्र ते जमत नसल्यामुळेच सनदशीर आणि संविधानिक मार्गानं आंदोलन करणा-यांना मारहाण करण्याची धमकी दिली जात आहे. महापौरांना भेटण्यासाठी पदाधिकारी गेले असताना त्यांच्या दालनात येऊन अशा पध्दतीनं दादगिरी करणं सभागृह नेत्यांना शोभणारं नाही. शिवशिल्पाच्या दुरूस्तीची मागणी करण्यासाठी गेलो होतो. पण ही मागणी जाणून घेण्याआधीच हाणामारीची भाषा करण्यात आली. यावरून या लोकांच्या मनात शिवरायांबद्दल किती प्रेम आहे ते दिसून आलं. मतं मागण्यासाठी समाजाच्या दारात येणारे हे लोक आज शिवरायांच्या वैचारिक वारसांना चिल्लर असं म्हणत असतील तर त्याचा हिशोब आगामी विधानसभा निवडणुकीत चिल्लर मोजायला लावून दाखवून देऊ असं यावेळी सांगण्यात आलं. महापौर दालनातून कृष्णा पाटील नावाच्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाला मानगुटीला धरून बाहेर नेण्यात आलं तेव्हा या मर्दाची मर्दुमकी कुठे गेली होती असा सवालही कैलाश म्हापदी यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading