गंधार संस्थेच्या कार्यक्रमातून ५१ हजारांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

शालेय पाठ्यपुस्तक बालभारतीच्या मराठी कवितांचा आविष्कार ठाण्यातील गंधार या संस्थेनं साकारला असून या कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या प्रयोगातून जमा झालेला ५१ हजारांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आला. प्रशांत डिंगणकर यांची संकल्पना आणि लेखन असलेला हा कार्यक्रम दादर येथे सादर झाला होता. ठाण्यातील ३० बच्चे कंपनीनं सादर केलेल्या रंगमंचीय आविष्काराचं सर्वांनी कौतुक केलं. कट्टीबट्टीनं केली सर्वांची सुट्टी अशा शब्दात शालेय शिक्षणमंत्र्यांनी कौतुक करत १ लाख १ हजार रूपये बक्षिस म्हणून संस्थेला दिले. मराठी बालभारतीचे पुस्तक दप्तराच्या ओझ्यात दुमडून पडू नये, त्यातील आस्वाद हा कवीमनानं बालमनाला घेता यावा तसंच या कविता विद्यार्थ्यांपर्यंत पोहचाव्यात या विचारातून प्रशांत डिंगणकर यांनी कट्टीबट्टी हा नृत्य, नाट्य, काव्य वाचनाचा आविष्कार साकारला. गंधार संस्थेनं त्याला मूर्त स्वरूप दिलं. या कार्यक्रमातील सर्व बाल कलाकार हे ठाण्यातील असून ठाण्यातील पहिला प्रयोग येत्या रविवारी गडकरीमध्ये होणार आहे. बाल कलावंतांच्या कौतुकासोबतच सामाजिक उपक्रमात ठाणेकरांनी सहभागी व्हावं असं आवाहन गंधार संस्थेनं केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading