विकास कामांच्या नावाखाली ठामपाच्या तिजोरीची लूट

ठाणे शहरात विकासकामे आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली ठाणे महापालिकेच्या तिजोरीची लूट होत असल्याचा आरोप करत आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली. ठाणेकरांच्या या तिजोरीचे रखवालदार म्हणून भूमिका बजावत प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला. शहरात विविध माध्यमांतून कोट्यवधींची विकास कामे होत आहेत. ही कामे अर्धवट आणि दर्जाहीन असतानाही कंत्राटदारांना देयके अदा करण्यात आल्याचा आरोप केळकर यांनी केला. यावेळी त्यांनी काही कामांचे पुरावेही सादर केले. या प्रकरणांमध्ये संगनमत असलेल्या अधिकारी आणि कंत्राटदारांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली. कोपरी येथे एक कोटी रुपये खर्चून जॉगिंग ट्रॅक बनवण्यात आला. हे काम अर्धवट असून दर्जाहीन आहे. तरीही त्याचे पैसे कंत्राटदाराला अदा करण्यात आले आहेत. २६ तलावांच्या दुरुस्ती आणि सुशोभिकरणासाठी १८६ कोटींची तरतूद करण्यात आली होती. केवळ विकासाच्या नावाखाली यात कोट्यवधींची लूट होत होती. याबाबत हरकत घेतल्यानंतर आता १५ तलावांसाठी ६० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भाजप विकास कामांच्या विरोधात नसून विकासकामांच्या नावाखाली होणाऱ्या लुटी विरोधात आहे असे केळकर यांनी स्पष्ट केले. उथळसर येथील जोगीला तलावासाठी या आधीच साडेतीन कोटींचा खर्च करण्यात आला आहे. एवढा खर्च करूनही येथील काम अर्धवट आहे. तरीही दुसऱ्या टप्प्यात या तलावासाठी नव्याने तरतूद करण्यात आल्याचे केळकर यांनी सांगितले.
शहरातील पदपथांच्या कामातूनही ठेकेदारांनी लूट केल्याचे त्यांनी सांगितले. त्याच-त्याच पदपथांवर पुन्हा काम करण्यात आले असून या कामांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.या बोगस विकासकामांचे पुरावे सादर करून संबंधितांवर कारवाईची मागणी आयुक्तांकडे केली. भाजप ठाणेकरांच्या प्रत्येक पैशाचा हिशोब घेणार असून प्रसंगी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.’श्रीरंग’च्या रस्तारुंदीकरणाबाबत आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे केळकर यांनी सांगितले. रस्ता रुंदीकरण करताना रहिवाशांना त्रास होणार नाही. हे काम करण्यापूर्वी रहिवाशांच्या सूचना आणि हरकतींचा विचार केला जाईल असे आयुक्तांनी सांगितल्याचे संजय केळकर म्हणाले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading