वाघबीळ गावात ५०० पोलीस घुसवून गावक-यांवर दहशत निर्माण केली जात असल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप

शिवसेनेचे ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांना रोखणा-या वाघबीळ ग्रामस्थांच्या विरोधात पोलीसी बळाचा वापर केला जात असून या गावात ५०० पोलीस घुसवून गावक-यांवर दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे लोकसभेचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना आव्हाड यांनी हा आरोप केला. राजन विचारे यांच्या प्रचार फेरीस वाघबीळ ग्रामस्थांनी विरोध दर्शवला होता. प्रचाराचा रथ गावात घेऊन पोहचलेल्या विचारेंना ग्रामस्थांनी विरोध करत जाब विचारला. त्यानंतर काल वाघबीळमध्ये ५०० पोलीस आणि राज्य राखीव दलाचा ताफा घुसवून गावक-यांवर दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. अशा दडपशाहीने निवडणुका जिंकता येत नाहीत कारण गावक-यांच्या विरोधाचे मूळ हे त्यांचे उपाशी पोट आहे. या गावक-यांच्या जमिनी विकल्या गेल्यानंतर त्यांनी यंत्रसामुग्री खरेदी करून नवीन व्यवसायाला सुरूवात केली. पण शिवसेनेच्या पुढा-यांनी या व्यवसायावरच डल्ला मारण्यास सुरूवात केली. त्यामुळं उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्यानेच गावक-यांनी विरोध करण्यास सुरूवात केली आहे. ज्या गावानं अनेक वर्ष नगरसेवक निवडून दिले त्याच गावात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. केवळ कोळी-आगरी नव्हे तर दलित, मुस्लिम, मराठा असे सर्वच लोक शिवसेनेला विरोध करत आहेत. सरकारी दडपशाहीचा वापर करून निवडणुका जिंकण्याचे स्वप्न सामान्य लोक उध्वस्त करणार आहेत. लोकं मोर्चाने येऊन मतदान करतील आणि सत्ताधा-यांची सत्ता उलथून लावतील. आज उपाशी पोटानं पेटलेली ही ठिणगी पुढे आगीत रूपांतर होईल असा इशाराही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading