वर्सोवा येथे उभारण्यात येत असलेल्या नवीन पूलाच्या कामातील अडथळे दूर

राष्ट्रीय महामार्गावर वर्सोवा येथे उभारण्यात येत असलेल्या नवीन पूलाच्या कामास गती देण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी अधिका-यांसमवेत पाहणी करून या पूलाच्या कामातील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय महामार्गावरील वर्सोवा येथील जुना पूल धोकादायक ठरला असून या पूलाची तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे. या पूलाच्या बाजूला ९७० मीटर लांबीचा ४ मार्गिका असलेला नवीन पूल बांधला जात असून हे काम संथगतीनं सुरू आहे. या पूलाचं भूमीपूजन २०१८ मध्ये होऊनही पूलाचं काम सुरू झालं नव्हतं. वनखात्याची परवानगी मिळवण्यासाठी संसदेत सतत पाठपुरावा आणि पत्रव्यवहार सुरू होता. त्यामुळं एप्रिल २०१९ मध्ये वनखात्याच्या सर्व परवानग्या मिळाल्यानंतर या कामाला सुरूवात झाली. हे काम २०२१ मध्ये पूर्ण होणं अपेक्षित होतं पण कोरोनामुळं तसंच मजुरांच्या तुटवड्यामुळे हे काम २०२२ मध्ये पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. आता या मार्गावरून रोज सव्वा लाख गाड्या ये-जा करतात. त्यामुळं या प्रकल्पातील २ अंडरपास फाऊंटन चौकामध्ये असल्यामुळं त्याचे काम सुरू करण्यासाठी वाहतुकीचं नियोजन आणि परवानगी आवश्यक आहे असं या भेटीदरम्यान सांगण्यात आलं. त्यावेळी पोलीस आयुक्त सदानंद दाते आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी या परवानग्या १५ दिवसात देण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळं आता या कामाला गती मिळण्याची आशा आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading