वर्तकनगर मधील म्हाडा वसाहतीतील चटई क्षेत्र निर्देशांक घोटाळ्याचा अहवाल तातडीनं उपलब्ध करून देण्याची नरेश म्हस्केंची मागणी

वर्तकनगर मधील म्हाडा वसाहतीतील चटई क्षेत्र निर्देशांक घोटाळ्याचा अहवाल तातडीनं उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी पालिकेच्या सहाय्यक संचालकांकडे केली आहे. वर्तकनगर येथील म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासात ठाणे महापालिकेच्या शहरविकास विभागानं बेकायदा पध्दतीनं १५ टक्के प्रोत्साहनपर चटई क्षेत्र निर्देशांकांची खैरात वाटली आहे. या चुकीची कबुली देत याबाबतचा सविस्तर अहवाल ७ दिवसात सादर करण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं होतं. मात्र अडीच महिन्यानंतरही हा अहवाल गुलदस्त्यात असल्याचा आरोप करत तो तातडीनं उपलब्ध करून देण्याची मागणी म्हस्के यांनी केली आहे. वर्तकनगरच्या म्हाडा वसाहतीत पुनर्विकासाचं काम करणा-या एका नामांकीत विकासकानं १५ टक्के प्रोत्साहनपर चटईक्षेत्र मिळवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू केले होते. या विकासकाची कार्यपध्दती संशयास्पद वाटल्यानं असं चटईक्षेत्र म्हाडा पुनर्विकासासाठी देता येतं का याबाबतचं स्पष्टीकरण पालिका प्रशासनानं राज्य सरकारकडून मागवलं होतं. नगरविकास विभागानं याबाबत नकारात्मक अभिप्राय दिला होता. हा अभिप्राय गहाळ करून विकासकानं चटईक्षेत्र लाटण्याचा डाव रचला होता. मात्र प्रशासनातल्या काही अधिका-यांच्या सतर्कतेमुळं त्या विकासकाचा डाव फसला होता. त्याची कुणकुण लागल्यानंतर नरेश म्हस्के यांनी फेब्रुवारी महिन्यातील सर्वसाधारण सभेत याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यावेळी राज्य सरकारच्या स्पष्टीकरणाची माहिती शहर नियोजन अधिकारी प्रमोद निंबाळकर यांनी दिली होती. मात्र यापूर्वीच अनेक विकासकांना १५ टक्के प्रोत्साहनपर चटईक्षेत्र देण्यात आल्याची धक्कादायक माहितीही सभागृहात उघड झाली होती. तशी कबुली देत निंबाळकर यांनी याबाबतचा अहवाल ७ दिवसात सादर करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण ते न झाल्यानं ही मागणी नरेश म्हस्के यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading