मुंब्रा डोंगरावर उभारलेले अनधिकृत दर्गे जमिनदोस्त करण्याची मनसेची मागणी

मुंब्रा डोंगरावर अनधिकृत दर्गे उभारल्याचा पर्दाफाश ठाणे शहर मनसेने केल्यानंतर वनविभाग खडबडून जागे झाले आहे. मुंब्रा डोंगरावर असलेल्या अनधिकृत बांधकामांची वनविभागाकडून पाहणी करण्यात आली. मात्र, मशिद आणि दर्ग्याचे सर्वेक्षण करून योग्य ती कारवाई करण्यात यावी यावर मनसे ठाम असून डोंगरावरील सर्वच अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात यावीत. यासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने काल ठाणे उपवनसंरक्षकांची भेट घेतली. ठाणे शहर मनसेनेही दोन दिवसांपूर्वी मुंब्रा डोंगरावरील अनेक बेकायदा दर्ग्याचा पर्दाफाश करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. ही जागा वनविभागाची असल्याने मनसेच्या तक्रारीची दखल घेत वनविभागाने तातडीने मुंब्रा डोंगरावरील बांधकामांची पाहणी केली होती. मात्र, कारवाईचा बडगा न उगारल्याने काल मनसे नेते अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे आणि मनसैनिकांच्या शिष्टमंडळाने उपवनसंरक्षक संतोष सस्ते यांची भेट घेतली. या भेटीनंतर वनाधिकाऱ्यानी मुंब्रा डोंगरावरील सर्वच अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करण्यात येईल. असे आश्वासित केल्याचे मोरे यांनी सांगितले. मुस्लीम बांधवांचा रमझान महिना सुरू असल्याने आम्हाला कोणतीही शांतताभंग करायची नाही. असे स्पष्ट करून रविंद्र मोरे यांनी, येणाऱ्या धमक्यांना आम्ही भिक घालत नसल्याचे सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading