कोपरीतील शेठ लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतिगृहात विशेष नवजात केअर युनिट उभारण्यास महापालिकेची मंजूरी

महापालिकेच्या कोपरी येथील शेठ लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतिगृहात चार स्त्रीरोग तज्ज्ञांच्या नियुक्तीसह १८ पेट्यांचे विशेष नवजात केअर युनिट (एसएनसीयू) उभारण्यास महापालिकेने मंजूरी दिली आहे. या निर्णयामुळे वेळेआधी जन्म घेणाऱ्या आणि कमी वजनाच्या मुलांवर लगेचच उपचार सुरू करता येतील. या प्रसूतिगृहात `एनएनसीयू’साठी भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांच्याकडून महापालिकेकडे पाठपुरावा केला जात होता. कोपरी येथील शेठ लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतिगृह सुरू करण्यासाठी माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांच्याकडून विधान परिषदेचे तत्कालीन उपसभापती वसंतराव डावखरे यांना विनंती केली होती. त्यांच्या निर्देशानंतर महापालिकेने कोपरीत प्रसूतिगृह सुरू केले होते. मात्र, या ठिकाणी `एनआयसीयू’ युनिट सुरू केले नव्हते. त्यामुळे वेळेआधी आणि कमी वजनाच्या मुलांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलवावे लागत होते. तर काही गरीब पालकांना कर्ज काढून, नवजात मुलाला खासगी हॉस्पिटलमधील `एनआयसीयू’ दाखल करावे लागत होते. काही वेळा पॅनलवरील डॉक्टर वेळेत न आल्यामुळे मुलांवरील उपचाराला अडचणी येत होत्या. या व्यथेबाबत भरत चव्हाण यांच्याकडून पाठपुरावा केला जात होता.
महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेऊन लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतिगृहात विशेष नवजात केअर युनिट (एसएनसीयू) युनिट उभारण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, आयुक्त बांगर यांनी कोपरीतील `एसएनसीयू’साठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. या ठिकाणी चार स्त्री रोग तज्ज्ञांच्या नियुक्तीसह १८ पेट्यांचे `एसएनसीयू’ युनिट उभारले जाईल, अशी माहिती भरत चव्हाण यांनी दिली. लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतिगृहात मातेची प्रसूती झाल्यानंतर कमी वजन आणि आजारी नवजात बालकांना छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये हलविले जात होते. त्यावेळी माता कोपरीत, तर मुल कळव्याला अशी स्थिती निर्माण होत होती. अशा परिस्थितीत मातेच्या जीवाची घालमेल होत असे. तर नातेवाईकांची दोघांची काळजी घेताना धावपळ उडत होती. कोपरीत नव्या`एसएनसीयू’ युनिटमुळे माय-लेकाची ताटातूट टळण्या बरोबरचं त्रास ही कमी होणार आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading