मालमत्ता कर भरण्यासाठी मोबाईल व्हॅन आपल्या दारी – आयुक्तांच्या संकल्पनेचे करदात्यांकडून कौतुक

सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर नागरिकांना वेळेत भरता यावा यासाठी ठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या संकल्पनेतून तसेच बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने मोबाईल व्हॅन उपलब्ध करण्यात आली असून आता करदात्यांना आपल्या दारातच कर भरणे सोयीचे झाले आहे. दरम्यान करदात्यांकडून मोबाईल व्हॅनला उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून ते या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करीत आहेत. मालमत्ता करदात्याच्या दारी जाऊन कर वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने स्मार्ट कर संग्रह प्रणाली ही ‘मोबाईल व्हॅन’ तयार करण्यात आली आहे. ही व्हॅन पूर्णतः रिझर्व बँक ऑफ इंडिया यांचे प्रमाणकानुसार असून यामध्ये संगणक, प्रिंटर आणि त्याकरता लागणाऱ्या सर्व सुविधा तसेच ऑपरेटर, ड्रायव्हर आणि सुरक्षा रक्षकही पुरवण्यात आले आहेत. याबाबतचा सर्व खर्च बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यामार्फत करण्यात आला आहे. या व्हॅनद्वारे एखाद्या गृहनिर्माण संस्थेमध्ये मालमत्ता कर वसूल करावयाचा असल्यास ही व्हॅन त्या प्रभाग कार्यालयाकडे पाठवण्यात येते. या व्हॅनद्वारे मालमत्ता करदात्यांनी मालमत्ता कर देयकाची मागणी केल्यास देयक सुद्धा देण्यात येत आहे. यामध्ये मालमत्ता कर रोखीने, धनादेश, धनाकर्ष अथवा डेबिट कार्ड, एटीएम कार्डने देखील भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कर भरल्यानंतर पावती देण्याची व्यवस्था मोबाईल व्हॅनमध्ये करण्यात आली आहे. एखाद्या गृहनिर्माण संस्थेने मालमत्ता कर भरणेकरिता व्हॅनची मागणी, विनंती केल्यास मोबाईल व्हॅन संबंधित गृहनिर्माण संस्थेमध्ये पाठवण्यात येणार असून मालमत्ता कराचे संकलन करण्यात येणार आहे. दरम्यान मालमत्ता कर संकलन करणेकरिता सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी अथवा इतर दिवशी संस्थेमध्ये कॅम्प राबविण्यात येत असून या वसुलीसाठी मोबाईल व्हॅनचा उपयोग केला जात आहे. मालमत्ता विभागाच्या वतीने मोबाईल व्हॅनची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. शहरातील करदात्यांना त्यांच्या घराजवळच स्वतःचा मालमत्ता कर मोबाईल व्हॅनद्वारे भरण्याची व्यवस्था ठाणे महापालिकेच्यावतीने निर्माण केल्याने करदात्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading