महाराष्ट्र, मराठी हक्काचे वाटणारे वेगळ्याच स्पर्धा भरवितात – तुषार भोसले यांची टीका

महाराष्ट्र आणि मराठी हे हक्काचे शब्द वाटणारे पक्ष भजन स्पर्धांऐवजी वेगळ्याच स्पर्धा भरवितात. तर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यापेक्षा भलतेच कार्यक्रम आयोजित करीत आहेत. कोणते कार्यक्रम घ्यावेत, याचे साधे भानही मंत्र्यांना नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केली.

विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्या जयंतीनिमित्ताने समन्वय प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पक्ष अध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे आयोजित केलेल्या भजन स्पर्धेचा बक्षीस समारंभ झाला. त्यावेळी भोसले बोलत होते. वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राच्या संस्कृतीला भजन ही सर्वात मोठी देणगी दिली आहे. भजन स्पर्धांसारख्या उपक्रमांमुळे आपल्या संस्कृतीला उच्च शिखर प्राप्त होत आहे. समर्थ रामदास हे सर्वात मोठे मॅनेजमेंट गुरू होते. त्यांनी परमार्थाच्या प्रसारासाठी ११०० मठ काढले. भजन स्पर्धांप्रमाणेच समर्थांच्या दासबोधातील विचार पोचविण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करावा, असे आवाहन कॉर्पोरेट किर्तनकार समीर लिमये यांनी केले. या भजन स्पर्धेत पुरुष गटात नादब्रह्म भजनी मंडळास प्रथम, माऊली मंडळ, ओम नादब्रह्म यांना द्वितीय तर अवधुत सुतार यांना तृतीय क्रमांक मिळाला. सर्वोत्कृष्ट गायक म्हणून सौरभ देशमुख, सर्वोत्कृष्ट पखवाज वादक – रुक्मिणी भजनी मंडळ, सर्वोत्कृष्ट तबला वादन – ओम नादब्रह्म भजनी मंडळ, तर सर्वोत्कृष्ट टाळ वादक म्हणून गणेश मंडळाला पारितोषिक मिळालं. महिला गटात आई एकविरा महिला मंडळास प्रथम, आई भवानी महिला प्रसारक मंडळास द्वितीय  तर श्री ओंकार प्रासादिक भजन मंडळास तृतीय क्रमांक मिळाला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading