महापालिकेत मोठा जमीन घोटाळा असल्याचा विरोधी पक्षनेते शानू पठाण यांचा आरोप

ठाणे महापालिकेत मोठा जमीन घोटाळा उघडकीस आला आहे. गेले 42 वर्षे महापालिकेचा ताबा असलेल्या भूखंडाच्या सातबा-यावर महापालिकेचं नाव नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या भूखंडावर महापालिकेची शाळा होती. मात्र आता हा भूखंड एका खासगी ट्रस्टला देण्याचा घाट घातला आहे. 15 हजार चौरस मीटरचा कोट्यवधी रुपयांचा हा भूखंड ठाणे पालिकेने ताब्यात घेऊन त्यावर धर्मवीर आनंद दिघे’ यांच्या नावाने शाळा किंवा महाविद्यालय उभारावे अशी मागणी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी केली आहे. शानू पठाण यांनी अचानक या भूखंडाची पाहणी केली. पालिकेच्या महासभेत जवळपास 4 तास यावर चर्चा झाली होती. नगरसेवक मिलिंद पाटणकर आणि नारायण पवार यांनी, उथळसर येथील शाळेच्या भूखंडावरील सातबा-यावर महापालिकेचे नाव नसतानाही 2017 मध्ये सभागृहात ठराव करून एका खासगी ट्रस्टला देण्याचा निर्णय घेतला होता असा आरोप पठाण यांनी केला. त्यावर महापौर नरेश म्हस्के आणि गटनेते नजीब मुल्ला यांनी सांगितले की पूर्वीच्या ट्रस्टला म्हणजेच सातबारा ज्यांच्या नावावर आहे त्यांना द्यावा, यासाठी पाटणकर आणि पवार हे प्रयत्नशील आहेत, असा प्रतीआरोप केला. त्यामुळेच नक्की हे प्रकरण काय? नक्की वस्तुस्थिती काय आहे? याची माहिती घेण्यासाठी शानु पठाण यांनी अचानक प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. महापालिकेची जर 40 वर्षे जुनी शाळा तोडून जुन्या ट्रस्टनं त्या भूखंडाच्या सातबा-यावर दावा करुन भूखंड मिळविण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. एकूणच हे चार नगरसेवक एकमेकांवर टीका करत आहेत. 15 हजार 200 चौरस मीटरचा हा भूखंड कोट्यवधी रुपयांचा आहे. असे असताना सातबा-यावर पालिकेचे नाव आहे किंवा नाही, हे जाणून घेण्याच्या वेळी पालिका झोपलेली होती का ? पालिका स्वतः सक्षम आहे तर मग इतकी वर्षे ही जागा का नाही नावावर झाली ? पालिकेने का स्वतःचे एखादं शाळा-महाविद्यालय बांधलं नाही? जर सातबारा पालिकेच्या नावावर नाही तर मग घाईघाईने का दुसर्‍या ट्रस्टला देण्यात आला? यासाठी ठराव मंजूर करताना त्याच्यावर सह्या कोणाच्या आहेत, ठरावाची तत्काळ अंमलबजावणी कोणाच्या आदेशावर झाली, असे प्रश्न शानू पठाण यांनी उपस्थित केले आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, महापौर नरेश म्हस्के यांनी करोडो रुपयांची ही मालमत्ता कोणालाही न देता पालिकेने स्वतः याठिकाणी शाळा महाविद्यालय बांधावे अशी विनंती शानू पठाण यांनी केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading