प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवडयात एक दिवस महिलांसाठी होणार लसीकरण

शहरात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत ठाणे महापालिकेने आजपर्यंत 9 लाख लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. हे करत असतानाच महिलांचेही जास्तीत जास्त लसीकरण व्हावे यासाठी प्रत्येक महिन्याच्या चौथ्या आठवड्यातील एक दिवस पार्किंग प्लाझा येथे महिलांसाठी खास लसीकरण होणार आहे. या उपक्रमाची सुरूवात येत्या सोमवार पासून करणार असल्याची माहिती महापौर आणि महापालिका आयुक्तांनी दिली. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसीचा डोस देण्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरू आहे. शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या लसीकरण साठ्यानुसार महापालिका तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये नागरिकांना पाहिला आणि दुसरा डोस देण्यात येत आहे. लसीकरण मोहिमेत महिलांचाही जास्तीत जास्त सहभाग असावा यासाठी खास महिलांसाठी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लसींच्या उपलब्धतेनुसार एक दिवस पार्किंग प्लाझा येथे लसीकरण होणार आहे. अनेक गरीब, गरजू महिला या विविध ठिकाणी कामे करत असतात, तसेच अनेकांना कामानिमित्त सकाळी लवकर बाहेर पडावे लागते, त्यामुळे त्यांना लसीकरण केंद्रावर जाणे शक्य होत नाही. तसेच अनेक महिला या गर्दी असल्यामुळे लसीकरण केंद्रावर थांबत नाही. ठाणे शहरात आतापर्यत एकूण 4 लाख 77 हजार 550 पुरूषांचे तर 4 लाख 23 हजार 488 महिलांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणाची आकडेवारी पाहता महिलांची संख्या कमी असल्याचे दिसून येते. लसीकरणामध्ये महिलांची संख्या वाढावी किंबहुना त्यांच्या लसीकरणाला गती मिळावी यासाठी खास महिलांसाठी हा उपक्रम सुरू करीत असून जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading