महापालिकेचा पशू वैद्यकीय विभाग कर्मचाऱ्यांविनाच कार्यरत असल्याचा नारायण पवारांचा आरोप

महापालिकेचा पशू वैद्यकीय विभाग कर्मचाऱ्यांविनाच कार्यरत असल्याचा आरोप नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे. कोरोना आपत्तीच्या कारणावरून या विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती आरोग्य विभागात करण्यात आली आहे. त्यातून पिसाळलेले कुत्रे पकडण्यासाठी कर्मचारीच उपलब्ध नाहीत. रायगड गल्लीत ८ ते १० जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावे घेतल्यानंतर ही बाब उघडकीस आली. ठाणे महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागाकडे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, कोरोनाच्या कारणामुळे या विभागातील कर्मचारी आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत पिसाळलेला कुत्रा पकडण्यासाठी लगेचच कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. त्यातून रायगड गल्लीत पिसाळलेल्या कुत्र्याच्या तडाख्यात ८ ते १० जण सापडले. त्यांना महापालिकेच्या बेजबाबदार कारभाराचा फटका बसला आहे, असा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केला. रायगड गल्ली परिसरात पिसाळलेल्या एका भटक्या कुत्र्याने नागरीकाला चावा घेतला. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी स्थानिक नागरीकांनी तातडीने नगरसेवक नारायण पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी संबंधित विभागात कर्मचारीच उपलब्ध नसल्याचे उघडकीस आले. आपल्या विभागातील सर्व कर्मचारी आरोग्य विभागात कार्यरत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यानंतर आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला पाठविण्यात आले. मात्र, या दिरंगाईत ८ ते १० जणांना कुत्र्याने चावे घेतले होते. या बेजबाबदारपणाबद्दल नारायण पवार यांनी महापालिका प्रशासनावर टीका केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading