भाडेतत्वावरील इमारतींमध्ये राहणा-या रहिवाशांना योग्य त्या सुविधा न पुरवल्यास आक्रोश लाँग मार्च काढण्याचा इशारा

भाडेतत्वावरील इमारतींमध्ये राहणा-या रहिवाशांना योग्य त्या सुविधा न पुरवल्यास या रहिवाशांसह आक्रोश लाँग मार्च काढण्याचा इशारा आमदार संजय केळकर यांनी महापालिका अधिका-यांना दिला आहे. ठाण्यातील मानपाडा येथील ॲक्मे दोस्ती आणि अन्य ठिकाणी असलेल्या इमारतीत बाधित लोकांना राहण्यास जागा देण्यात आली आहे. परंतु ही लोकं त्या ठिकाणी नरक यातना भोगत असून महापालिकेनं जर या लोकांना तात्काळ योग्य त्या सुविधा दिल्या नाहीत तर आक्रोश लाँग मार्च मोर्चा महापालिकेवर काढू असा इशारा आमदार संजय केळकर यांनी महापालिका अधिका-यांसमवेत झालेल्या बैठकीत दिला. ठाण्यातील विविध विषयांसंदर्भात आमदार संजय केळकर यांनी अतिरिक्त आयुक्त अहिवार यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली. या बैठकीला नगरसेवक सुनेश जोशी, उपायुक्त अशोक बुरपुले, शहर अभियंता देशमुख, अन्य विभागाचे अधिकारी, बापू साळवे आणि भाडेतत्वावर राहणा-या रहिवाशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. काही ठिकाणी ड्रेनेज तुंबले आहेत तर काही ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे. २२ ते ३० मजल्याच्या इमारतींमध्ये चार चार लिफ्ट आहेत पण त्यातील एकच लिफ्ट चालू आहे तर बाकीच्या बंद असल्यानं ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत असल्याचं केळकर यांनी या बैठकीत निदर्शनास आणून दिलं. याबाबत केळकर यांनी आक्रमक भूमिका घेऊन महापालिकेच्या दुर्लक्षामुळे रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून या रहिवाशांना योग्य त्या सुविधा मिळाल्याच पाहिजेत असं त्यांनी अधिका-यांना सुनावले. या बैठकीमध्ये शहरातील वाढती अतिक्रमणं, रस्ते, उद्यानं ही महापालिकेनं संस्थांना काही अटी-शर्तींवर दिल्यास त्यांची देखभाल होऊ शकते असा मुद्दाही संजय केळकर यांनी या बैठकीत मांडला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading