ठाणे मनोरूग्णालयातील प्रशासकीय यंत्रणा कोलमडली

ठाणे मनोरूग्णालयातील मानसोपचार तज्ञ हे पद गेले काही महिने रिक्त असून यामुळं मनोरूग्णालयातील प्रशासकीय यंत्रणा कोलमडली आहे. या रूग्णालयात महिला मनोरूग्णांसाठी एकूण १२ वॉर्ड आहेत. त्यामध्ये ३४५ महिला मनोरूग्ण आहेत. या सर्व रूग्णांना चहा, नाश्ता, दुपार आणि रात्रीचं जेवण वेळेवर पुरवावं लागतं. प्रत्येक वॉर्डमध्ये जेवणाची भांडी नेण्यासाठी ट्रॉली आहे. या ट्रॉलीचं वजन दीडशे किलो असून जेवणाची भांडी ठेवल्यावर तिचं वजन साडेतीनशे किलोपर्यंत जातं. अशा ट्रॉल्या रोज ढकलत महिला कर्मचारी वॉर्डपर्यंत नेतात. याबाबत महिला कर्मचा-यांनी मनोरूग्णालय प्रशासनाकडे तक्रारीही केल्या पण गेल्या आठ महिन्यापासून त्यावर काहीच हालचाल झालेली नाही. वजनदार ट्रॉली ढकलल्यामुळं या महिला आजारपणाच्या शिकार झाल्या आहेत. याप्रकरणी सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांची भेट घेतली जाणार असून वेळ पडल्यास आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र औद्योगिक कर्मचारी कामगार संघाचे अध्यक्ष अ. द. कुळकर्णी यांनी दिला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading