बोअरवेल खोदण्यासाठी परवानगी देताना बोअरवेलमध्ये पावसाचा पाणी साठा करण्याची अट घालण्याची खासदार श्रीकांत शिंदेंची मागणी

बोअरवेल खोदण्यासाठी परवानगी देताना वर्षा जलसंचयनाच्या माध्यमातून बोअरवेलमध्ये पावसाचा पाणी साठा करण्याची अट घालावी अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे केली आहे. वार्षिक दरडोई १७०० घनमीटर पाणी साठा असणं हा सावध करणारा इशारा असून १ हजार घनमीटर पाण्याचा साठा हे पाण्याचं दुर्भिक्ष्य असल्याचं निदर्शित करतं. निती आयोगानं देशातील दिल्ली, चेन्नई, हैद्राबाद, बेंगलुरू शहराबरोबर एकूण २१ शहरांना डे झिरो चे संकट वर्तवले आहेत. भूजल पातळी कशाप्रकारे वाढवता येईल याचा विचार करणं गरजेचं असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. देशात बोअरवेल मोठ्या प्रमाणावर कोरड्या पडल्या आहेत. बोअरवेलला पाणी लागावं म्हणून अतिखोल खोदण्याचे प्रकार वाढले आहेत. याला आळा घालण्यासाठी कायदा केला जाणार आहे का असा प्रश्न उपस्थित करत बोअरवेल खोदण्यासाठी परवानगी देताना वर्षा जलसंचयनाच्या माध्यमातून बोअरेवलमध्ये पावसाचं पाणी साठवण्याची अट घालण्याची मागणी श्रीकांत शिंदे यांनी केली. यावर केंद्र सरकार अशा प्रकारचा समान कायदा करू शकत नसल्याचं स्पष्ट करत काही राज्यांनी बोअरवेल खोदण्याच्या मर्यादेसंदर्भात पावले उचलल्याचं जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading