पालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळेच रेमडेसिवीरची टंचाई निर्माण झाल्याचा ठाणे मतदाता जनजागरण अभियानाचा आरोप

कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून इस्पितळात बेड उपलब्ध होत नाहीत, त्यातून रूग्णालयात प्रवेश मिळाला तरी ऑक्सीजनची कमतरता आणि रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी मारामार यामुळे ठाणे शहरातील करोनाबाधित रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक एकीकडे प्रचंड हतबल झाले असताना दुसरीकडे ठाणे महापालिकेची ढिसाळ यंत्रणा आणि निष्क्रिय प्रशासनाचे वाभाढे निघत असल्याचे दुर्दैवी चित्र समोर आले आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात टंचाई होण्यामागे वास्तव अतिशय भयानक असून रुग्णांची संख्या वाढणे हे त्याचे कारण नाही तर पालिकेच्या आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभारामुळेच इंजेक्शनची टंचाई निर्माण झाली आहे असा आरोप ठाणे मतदाता जनजागरण अभियानाच्या सचिव चेतना दिक्षीत यांनी केला आहे. दिक्षित गेल्या महिनाभरात दिवस-रात्र रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बेड मिळवून देण्यासाठी मदत करीत आहेत, त्यामुळे ठाण्यातील सर्व खाजगी आणि सरकारी रूग्णालयं आणि पालिकेचे आरोग्य-यंत्रणेतील कर्मचा-यांच्या त्या संपर्कात आहेत. प्रशासन यंत्रणा इतकी ढिली असून त्यावर लोकप्रतिनिधींचे अजिबात नियंत्रण नसल्यामुळे अनेक रूग्णालयात गेले महिनाभर ऑक्सीजनचा तुटवडा जाणवत होता असं त्यांनी सांगितलं. रुग्णसंख्या वाढत असताना वेगाने निर्णय घेऊन हा पुरवठा सुरळीत करणे गरजेचे होते. पण प्रशासन गंभीर नसल्याने तसंच त्यांना जाब विचारणारे कोणी नसल्यामुळे दुर्दैवाने निर्णय घेण्यात प्रचंड ढीसाळपणा झाला आणि ऑक्सीजनचा तुटवडा प्रमाणाबाहेर वाढला. त्यामुळे डॉक्टरांना नाइलाजाने इंजेक्शनचा सहारा घ्यावा लागल्याचं डॉ चेतना दिक्षित यांनी हे स्पष्ट केले असून आज ठाणे शहरातील परिस्थिति अजून हाताबाहेर जाण्याची शक्यता वर्तविली आहे. गंभीर होत जाणार्‍या परिस्थितीमध्ये आता ठाणेकरांना कोणी वाली राहिलेला नाही, रुग्णांना धावपळ करून तातडीने मदत उपलब्ध करून देणे, रूग्णांच्या नातेवाईकांशी बोलून त्यांना मानसिक आधार देणे यासाठी ठाणे शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यातील शेतकरी कामगार पक्ष, जनता दल, धर्मराज्य पक्ष, आम आदमी पार्टी, स्वराज इंडिया, ऐक्यवादी रिपब्लिकन पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी या परिवर्तनवादी पक्षांच्या तसेच लोकराज संघटन आणि मतदाता जागरण अभियान या नागरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या नागरिक विकास आघाडीच्या वतीने ठाणे शहरातील नागरिकांसाठी एक हेल्प-लाइन सुरू करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. रुग्णांना बेड आणि इस्पितळतील रुग्णांना इंजेक्शन मिळवून देण्यासाठी गरीब आणि सर्वसामान्य जनतेला या हेल्पलाइनच्या माध्यमातून ठाणे नागरिक विकास आघाडीचे कार्यकर्ते २४ तास मदतीचा हातभार लावणार आहेत. उद्यापासून सुरू होणार्‍या या हेल्प-लाइनच्या माध्यमातून आरोग्य-यंत्रणेवर लक्ष ठेवण्याचा आणि इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्याचा देखील प्रयत्न करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. नागरिकांनी मदतीसाठी अनिल म्हात्रे यांच्याशी 9833054856 आणि डॉ चेतना दिक्षित यांच्याशी 9867100199 या दूरध्वनीवर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading