पालिका आयुक्तांच्या आश्वासना नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा तूर्त स्थगित

कळवा- खारीगाव, विटावा भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईने नागरीक हैराण झाले आहेत. ही पाणीटंचाई दूर करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ. जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांच्या नेतृत्वाखाली कळवा प्रभाग समितीवर हजारो लोकांचा जनआक्रोश मोर्चा नेण्यात येणार होता.पण तत्पूर्वीच आयुक्त संजीव जयस्वाल यांनी राष्ट्रवादीच्या सर्व मागण्या मान्य केल्यामुळे हा मोर्चा स्थगित करण्यात आला असल्याचे माहिती विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी दिली. सध्या ठाणे शहरात सर्वत्र पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. ठाणे महापालिका विविध स्रोतांमार्फत दररोज 480 दशलक्ष लिटर पाण्याचे शहरात वितरण करते. कळवा भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण आणि स्टेम कंपनी कडून पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. यापैकी स्टेमकडून बुधवारी तर एमआयडीकडून शुक्रवारी पाणीपुवठा बंद ठेवण्यात येत आहे. मंगळवारी रात्री पाणीपुरवठा बंद केल्यानंतर गुरुवारी पहाटे पाण्याचा पुरवठा करण्यात येत असतो. मात्र, पाण्याचा दाब योग्यरित्या तयार न झाल्याने गुरुवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यातच शुक्रवारी पुन्हा शटडाऊन घेतले जात असल्याने थेट रविवारीच पाणी येत आहे. त्यामुळे कळवा-खारीगाव-विटावावासियांना आठवड्यातून फक्त दोनच दिवस पाण्याचा पुरवठा होत आहे. पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने ठाणेकरांना पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी जनआक्रोश मोर्चाचे नियोजन करण्यात आला होते. याच मोर्चाच्या अनुषंगाने आज आयुक्त संजीव जयस्वाल आणि विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांच्यासह कळवा परीसरातील नगरसेवकांशी चर्चा केली. यावेळी झालेल्या बैठकीमध्ये मोर्चेकर्‍यांच्या सर्व मागण्या मंजूर करण्यात आल्या. स्टेम आणि एमआयडीच्याशटडाऊनच्या वेळा सामायिक करुन एकाच दिवशी शटडाऊन घेण्याची विनंती दोन्ही संस्थांना करण्यात येईल; पाणीवाटपातील तफावत दूर करण्यात येईल; कळव्यात पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल आदी आश्वासने आयुक्तांनी दिली. त्यामुळे हा मोर्चा तूर्तास स्थगित करण्यात आले असल्याचे मिलींद पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading