विद्यार्थ्यांना शहराची पर्यटनाद्वारे नवीन ओळख करून देण्यासाठी विविध योजना शिक्षण विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणार.

शाळांचा शैक्षणिक दर्जा राखण्यासाठी नवनवीन योजना राबविणे तसेच सर्व शाळांमध्ये समानता, भौतिक सुविधा उपलब्ध करणे, शैक्षणिक सहकार्य सेतू, दिपस्तंभ तसेच परिवहन बसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ठाणे शहराची पर्यटनाद्वारे नवीन ओळख करुन देणे आदी विविध योजना शिक्षण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. गणित, इंग्रजी यासारख्या अवघड विषयांबाबत शिक्षकांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत मुख्याध्यापकांसाठी आयोजित केलेल्या सहविचार सभेमधून व्यक्त करण्यात आले. ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाने महापालिका क्षेत्रातील पालिका, खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्य प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकांसाठी नुकतीच सहविचार सभा आयोजित केली होती. या कार्यक्रमास शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, अतिरिक्त आयुक्त 2 समीर उन्हाळे, उपायुक्त मनिष जोशी, शिक्षणाधिकारी शेषराव बडे, यशदा संस्थेचे कार्यक्रम अधिकारी शाम मकरंदपुरे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संतोष कदम तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.शैक्षणिक धोरणाच्या बदलाप्रमाणे बदलता आले पाहिजे तसेच विद्यार्थी सुरक्षिततेबाबत मुख्याध्यापकांनी दक्ष असणे आवश्यक असल्याचे मत शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी व्यक्त केले. गणित सर्व मुले शिकतात असे सांगत शिक्षकांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत शाम मकरंदपुरे यांनी व्यक्त केले. शालेय व्यवस्थापन, शिक्षण कार्यप्रणाली, नवनवीन पध्दती, शिक्षक प्रशिक्षण, स्वच्छता नियोजन, वातावरण निर्मिती,अध्ययन अध्यापना वातावरण निर्मिती असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे हे शालेय जीवनापासूनच देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढविण्यासाठी शिष्यवृत्ती सारख्या परीक्षांसाठी त्यांना प्रोत्साहित करुन परीक्षांबाबत त्यांना मार्गदर्शन करणे आदी विविध मते या सहविचार सभेत मुख्याध्यापकांकडून व्यक्त करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading