रेतीबंदर पादचारी पूलाचं काम वेगवान पध्दतीनं व्हावं, भास्करनगर ते वाघोबानगर पादचारी पूल, मुंब्रा रेल्वे स्थानकात सरकते जिने आणि पारसिक रेल्वे स्टेशन संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा केली असून संबंधित अधिका-यांनी याला अनुकुलता दर्शवली आहे. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे गेले अनेक दिवसांपासून रेतीबंदर पादचारी पूलासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर पादचारी पूल मंजूर करण्यात आला आहे. या पूलाचं काम तसंच भास्करनगर ते वाघोबानगर दरम्यान रेल्वे रूळावर पादचारी पूल, मुंब्रा रेल्वे स्थानकात सरकते जिने आणि पारसिक रेल्वे स्थानक आदी मागण्या तात्काळ मंजूर करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाशी पाठपुरावा करण्याकरिता आव्हाड यांनी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना विनंती केली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्विनी लोहाणा यांची भेट घेऊन त्यांना या मागण्यांचं निवेदन दिलं. लोहाणा यांनी खासदार सुळे यांच्या मागण्या मान्य केल्या असून लवकरच या मागण्यांच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे.