नोकरीचं आमिष दाखवून बेरोजगार तरूणांची लाखो रूपयांची फसवणूक करणा-या दोघांना अटक

नोकरीचं आमिष दाखवून बेरोजगार तरूणांची लाखो रूपयांची फसवणूक करणा-या दोघांना गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे इस्टेट युनिटनं अटक केली आहे. अनुजकुमार आणि गौरवकुमार झा यांनी सिनेवंडर मॉलमधील एका गाळ्यात एम ग्रोथ कन्सल्टंसी सर्व्हीसेस नावाची कंपनी सुरू केली होती. मलेशिया सारख्या देशात चांगल्या वेतनाची नोकरी लावण्याची जाहिरात त्यांनी युट्यूबवर टाकली होती. ही जाहिरात पाहून अनेक बेरोजगार तरूणांनी त्यांच्याशी संपर्क साधला. ही जाहिरात पाहून विक्रमकुमार भाटी यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनाही असेच आमिष दाखवण्यात आलं. ऑक्टोबर २०१८ ते एप्रिल २०१९ या सहा महिन्याच्या कालावधीत त्यांच्याकडून २ लाख ६० हजार रूपये उकळण्यात आले. पण त्यांना नोकरीला काही लावण्यात आलेच नाही. वारंवार संपर्क करूनही नोकरीही नाही आणि पैसेही परत मिळत नसल्यामुळं त्यांनी फसवणूक झाल्याची तक्रार पोलीसांकडे केली. गुन्हे शाखेनं पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या अनुजकुमार आणि गौरवकुमार या दोघांना अटक केली. पोलीस चौकशीत या दोघांनी ४० जणांची सुमारे ५१ लाखांची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. परदेशात नोकरीचं आमिष दाखवून हे दोघे बेरोजगारांकडून पैसे उकळत असत आणि नंतर त्यांना पर्यटक व्हिसाद्वारे मलेशियात पाठवण्याची त्यांची पध्दत होती. मात्र तिथे त्यांना कोणतीही नोकरी मिळण्याऐवजी पोलीसांच्याच चौकशीला सामोरं जावं लागत असे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading