डासांपासून पसरणा-या मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनियासारख्या साथीच्या आजारांवर नियंत्रणासाठी डास-अळीनाशक औषध फवारणी करण्यासाठी देण्यात येणारा ठेका गेल्या ९ महिन्यापासून निविदा प्रक्रियेत अडकला आहे. ही निविदा प्रक्रिया त्वरीत पूर्णत्वास नेऊन आरोग्याचा महत्वपूर्ण प्रश्न निकाली न काढल्यास भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा आनंद दिघे युवा प्रतिष्ठाननं दिला आहे. साथीच्या आजारावर नियंत्रणासाठी डास-अळीनाशक औषध फवारणीसाठी दिल्या जाणा-या ठेक्याचं काम सप्टेंबर २०१८ पासून निविदा प्रक्रियेत आहे. ही निविदा प्रक्रिया फक्त ६ महिन्यासांठी होती. मात्र कामाची गरज लक्षात घेऊन या कामाला तीन महिन्यांची मुदतवाढ देऊन नव्यानं दोन वर्षासाठी निविदा काढण्याची सूचना आरोग्य विभागाला देण्यात आली होती. मात्र आत्तापर्यंत हे काम पूर्ण झालेलं नाही. याप्रकरणी येत्या ८ दिवसात काम सुरू न झाल्यास अधिका-यांच्या टक्केवारीसाठी भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या केदार दिघे यांनी दिला आहे.