नवी मुंबईकरांसाठी बेलापुर ते भाऊचा धक्का प्रवासी बोट सुरू होणार

नवी मुंबईकरांना लाभलेला खाडी किनारा लक्षात घेता जलवाहतूक मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे खासदार राजन विचारे बेलापूर येथे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मार्फत तसेच नेरुळ येथे सिडको मार्फत असलेली जेट्टीची कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करीत होते. त्यांच्या पाठपुराव्याने ही सर्व कामे पूर्णत्वास येत आहेत. अंतिम टप्प्यातील कामे कितपत पूर्ण झाली आहेत याचा आढावा घेण्यासाठी बेलापूर आणि नेरूळ येथील जेट्टीची विचारे यांनी पाहणी केली. त्यामध्ये सिडको मार्फत ११० कोटी खर्च करून नेरूळ येथे उभारण्यात आलेल्या जेट्टीचे काम पूर्ण झाले. या कामात महत्त्वपूर्ण असलेली प्रवाशांसाठी चढण्या आणि उतरण्यासाठी फेंडर तसंच स्टेअरकेस यांची कामे शिल्लक असून येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहेत. तसेच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत बेलापूर येथे पर्यटकांकरिता जेट्टी बनविण्याच्या कामास २०१८ मध्ये केंद्र शासनाच्या सागर माला योजने अंतर्गत मंजुरी मिळाली असून यामध्ये केंद्रशासन ५० टक्के व राज्य शासनाचे ५० टक्के असे एकूण ८.३० कोटी अनुदानास मंजुरी मिळवली होती. या कामास जानेवारी २०१९ ला कार्यादेश मिळाल्यानंतर ऑगस्ट २०१९ ला पर्यावरण खात्याकडून सी आर झेड ची मान्यता मिळाल्यानंतर जेट्टीचे काम सुरू झाले. ही जेट्टी ही L टाईप मध्ये आहे त्याची लांबी 71×10 उतरणारी जेट्टी 55×10 अशी असणार आहे. सद्यस्थितीत जेट्टीचे काम ९५% पूर्ण झालेले आहे. उर्वरित ५ टक्के जेट्टीवर येणाऱ्या रस्त्याचे काम बाकी आहे. येत्या १५ दिवसात हे काम पूर्ण होणार आहे. विचारे यांनी काल मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन नेरूळ तसेच बेलापूर येथील जेट्टीची कामे लवकर मार्गी लावून याचा लोकार्पण सोहळा करण्यात यावा असे प्रशासनाला आदेश देण्याची विनंती केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी यांची भेट घेऊन कामाची स्थिती जाणून घेतली. त्यामध्ये महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने पर्यटकांसाठी पॅसेंजर बोट आणि वॉटर टॅक्सी देण्याचे ठरविले आहे. पॅसेंजर बोट मध्ये ५० व्यक्ती बसण्याची क्षमता असणार आहे. या बोटीतून बेलापुर ते भाऊचा धक्का येथे जाण्यासाठी ३०० रुपये मोजावे लागणार आहेत या बोटीतून प्रवासासाठी ४५ ते ५५ मिनिट लागणार आहेत. तसेच वॉटर टॅक्सी यामध्ये १० व्यक्ती बसण्याची क्षमता असणार आहे.
बोटीतून बेलापुर ते भाऊचा धक्का पर्यंत ९०० रुपये मोजावे लागणार आहेत. या बोटीतून प्रवासासाठी ३० मिनिट लागणार आहेत. तसेच प्रवाशांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामध्ये चार चाकी गाड्यांसाठी 75 गाड्यांचे क्षमता तसेच दुचाकीसाठी 80 गाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे अशी माहिती देण्यात आली असून लवकरात लवकर याची ट्रायल घेण्यासाठी बोट आपण आणावी अशी विनंती राजन विचारे यांनी केली आहे. खासदार राजन विचारे यांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मार्फत पर्यटकांसाठी या बोटीतून वातानुकूलित सेवा देण्याची विनंती केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading