नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हर्च्युअल पदवीदान सोहळ्यात पदवी प्रदान

मंत्रिपदाच्या व्यापातून, व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून बीएचा अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी संपादन करण्याचे स्वप्न पूर्ण केलेले नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हर्च्युअल पदवीदान सोहळ्याच्या माध्यमातून नुकतीच प्रदान करण्यात आली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली हा व्हर्च्युअल सोहळा झाला. परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले तरी शिंदे यांच्या मनात शिक्षणाची जिद्द आणि तळमळ कायम होती. त्यामुळे संधी मिळताच त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून चिकाटीने अभ्यास पूर्णकरून गेल्या वर्षी ते बीए परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. गेल्या वर्षी करोनामुळे ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने झाली होती. मराठी आणि राजकारण असे दोन विषय घेऊन एकनाथ शिंदे अंतिम वर्षाच्या परीक्षेत ७७.२५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले होते. या परीक्षेचा पदवीदान समारंभही करोनामुळे व्हर्च्युअल पद्धतीनेच झाला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात कुलगुरू प्रा. ई. वायूनंदन आणि कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांच्या हस्ते उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. शिंदे यांच्यासह गोंदिया येथील शैलेश चुटे, मुंबईतील सईद रुखसार फातेमा सईद अहमद, निकेश कुऱ्हाडे या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात गौरवण्यात आले. या सोहळ्यात २०१९ आणि २०२० या दोन वर्षांत विविध विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना पदविका, पदव्युत्तर पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, एम फिल, पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading