देशामध्ये समान नागरी कायदा लावण्याची राज ठाकरे यांची मागणी

देशामध्ये समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात बोलताना केली. गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर आयोजित सभेत त्यांनी केलेल्या वक्तव्यावर उठलेल्या वावटळीला उत्तर देण्यासाठी ठाण्यात आयोजित उत्तरसभेत बोलताना राज ठाकरे यांनी ही मागणी केली. धर्म हा घराच्या आत असावा आणि लोकसंख्येवर नियंत्रण ठेवलं न गेल्यास उद्या हा देश फुटू शकतो अशी भावना ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
मशिदींवरील भोंग्यांचा त्रास संपूर्ण देशाला होत आहे. येत्या ३ मे रोजी ईद आहे. या तारखेपर्यंत सरकारने मौलवींशी चर्चा करून भोंगे उतरवावेत, अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालिसा लावूच असा निर्वाणीचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर राज्यात जातीयवाद बोकाळला, या वक्तव्याचा राज यांनी पुनरुच्चार केला. शरद पवार हे नेहमीच आपल्या भाषणात महाराष्ट्र हा शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे असे म्हणतात. पण त्याआधी हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. मुसलमानांची मते मिळणार नाहीत, या भीतीने पवार छत्रपतींचे नाव घेत नाहीत अशी टीका राज यांनी केली. त्यामुळे छत्रपतींच्या नावाने राजकारण करण्यासाठी आणि माथी भडकाविण्यासाठी राष्ट्रवादीने संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनांची निर्मिती केल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी यावेळी केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading