आनंद दिघे यांच्यावरील चित्रपटात प्रसाद ओक साकारणार दिघेंची भूमिका – १३ मे ला होणार प्रदर्शित

जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे ‘लोककारणी’ म्हणजे आनंद दिघे. आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रुपात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच यात आनंद दिघे यांची भूमिका कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघेंची व्यक्तिरेखा साकारणार आहे. प्रवीण विठ्ठल तरडे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओजने केली आहे. येत्या १३ मे रोजी धर्मवीर मु.पो. ठाणे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. गरीब, शोषितांच्या अन्यायाला वाचा फोडणारे आणि जुलूमाची भाषा करणाऱ्यांवर आपली जरब बसवणारे हे व्यक्तिमत्व. आनंद दिघे यांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे तळागाळातील लोकांचा विचार. माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत होती. सामान्य माणसाची कितीही छोटी किंवा कितीही मोठी समस्या असू दे ती सोडवणं हेच त्यांच्या जीवनाचं जणू व्रतच होतं. घरावर तुळशीपत्र ठेवून निघालेल्या, बँकेत अकाउंट नसलेल्या आणि दोन्ही खिसे रिकामे असलेल्या या माणसाची श्रीमंती होती ती सामान्य माणसाचा पाठिंबा. आनंद दिघे आज लौकिक अर्थाने हयात नसले तरी सर्वसामान्यांच्या मनात ते आजही जिवंत आहेत. अशा लार्जर दॅन लाईफ’ व्यक्तिमत्वावर चित्रपट बनवणे हे शिवधनुष्य पेलण्याइतकंच जिकरीचं आणि त्यातही त्यांची व्यक्तिरेखा साकारणं हे त्याहूनही अवघड काम. परंतु या दोन्ही जबाबदाऱ्या अतिशय सक्षमपणे आपल्या खांद्यावर घेतल्या त्या दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि अभिनेते प्रसाद ओक यांनी. आनंद दिघे यांचा एवढा मोठा जीवनप्रवास चित्रपटात मांडणं तसं अवघडच काम पण हा सगळा घाट घातला तो निर्माते मंगेश देसाई यांनी. येत्या १३ मे रोजी ‘धर्मवीर मु. पो. ठाणे’ हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading