दिवसाला एक टक्का परतावा देण्याचं आमिष दाखवत फसवणूक करणा-या ५ जणांच्या टोळीला अटक

बनावट कंपन्या स्थापन करून दिवसाला एक टक्का देण्याचं आमिष दाखवत गुंतवणूकदारांची फसवणूक करणा-या आंतरराज्यीय टोळीस ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या टोळीनं आत्तापर्यंत १ कोटी ४० लाख रूपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. कापुरबावडी येथील सिटी मॉलमध्ये रेड रॉक गेम, टिप्स झोन ॲडव्हायझरी प्रायव्हेट लिमिटेड, क्रिप्टो ट्रेड, जियाकुल अशा नावानं बनावट कंपन्या काढून ही फसवणूक सुरू होती. गुंतवणूकदारांना प्रतिदिन एक टक्का व्याज तर जो व्यक्ती या कंपनीत गुंतवणूकदार घेऊन येईल त्यांना दर आठवड्याला ३ टक्के रॉयल्टी देण्याचं आमिष दाखवलं जात असे. या आमिषाला भुलून अनेकांनी गुंतवणूक केली. मात्र कुठलाही परतावा न मिळाल्यानं एका गुंतवणूकदारानं कापुरबावडी पोलीसांकडे तक्रार केली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण सोपवण्यात आलं. आर्थिक गुन्हे शाखेनं केलेल्या तपासात या टोळीनं एकूण ९ गुंतवणूकदारांची १ कोटी ४० लाखांची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी पोलीसांनी प्रकाश मोरे, संदीप पाटील, उमंग शहा, अजय जरीवाला आणि रितेश पटेल अशा ५ जणांना अटक केली आहे. रितेश पटेल हा या टोळीचा प्रमुख आहे. त्याच्यासह त्याच्या साथीदारांची ७ बँक खाती सील करण्यात आली आहेत. या टोळीनं महाराष्ट्रासह दिल्ली, गुजरात, छत्तीसगड, हरियाना आदी राज्यात फसवणूक केल्याचं आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय जाधव यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading