धोकादायक होर्डींगसाठी पैसे घेणा-या खासदाराचं नाव जाहीर करावं अन्यथा पुराव्यासह राष्ट्रवादीचा भ्रष्टाचार उघड करण्याचा आमदार प्रताप सरनाईक यांचा इशारा

धोकादायक होर्डींगसाठी पैसे घेणा-या खासदाराचं नाव पुराव्यासह जाहीर करावं अन्यथा ज्यांनी पत्रकार परिषद घेत हा आरोप केला त्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यात जाहीर करावी लागतील असं प्रति आव्हान शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत धोकादायक होर्डींगसाठी एका खासदारानं ५ लाख घेतल्याचा आरोप केला होता. हे धोकादायक होर्डींग आमदार प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघात येतं. त्यामुळं कुठल्या खासदारानं या धोकादायक होर्डींगसाठी पैसे घेतले हा प्रश्न आपल्यालाही पडलेला आहे असं म्हणत आमदार प्रताप सरनाईक यांनी हे आव्हान दिलं आहे. शहरातील ब-याच अधिकृत आणि अनधिकृत होर्डींगमध्ये राष्ट्रवादीचा कुठला नेता भागीदार आहे तसंच राष्ट्रवादीचा कुठला नेता अनधिकृत बांधकामांमध्ये सहभागी आहे तसंच कुठला नेता शहरातील पर्यावरणाचा -हास होत असताना बिल्डरांची सुपारी घेऊन बेकायदेशीर झाडं तोडतो ती नावं आम्हांला जाहीर करावी लागतील असा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. निवडणुकीच्या तोंडावर काही वादग्रस्त प्रकरणं काढून स्वत:ला प्रसिध्दीच्या झोतात ठेवण्यासाठी हा खटाटोप असून सत्य बोलण्याची आणि पचवण्याची हिंमत असेल तर त्या खासदाराचं नाव जाहीर करावं अन्यथा येत्या रविवारी होणा-या शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यात पुराव्यासह त्या भ्रष्टाचारी नेत्यांची नावं जाहीर केली जातील असं आव्हान आमदार प्रताप सरनाईक यांनी जितेंद्र आव्हाडांचं नाव न घेता त्यांना दिलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading