ठाण्यात वादळामुळे झालेल्या नुकसानीला मानवनिर्मित चुकाही तितक्याच जबाबदार

अलिकडेच आलेले तौक्ते वादळ हे हाहा:कार उडवून देणारं ठरलं असलं तरी यातील काही झालेली नुकसानं ही मानव निर्मित असल्याचंच दिसत आहे. तौक्ते वादळानं संपूर्ण राज्यात धुमाकूळ घातला. ठाण्यालाही याचा चांगलाच फटका बसला. ठाण्यामध्ये तौक्ते वादळाच्या तडाख्यात पावणे दोनशे झाडं पडली तर ५० हून अधिक झाडांच्या फांद्याही तुटून रस्त्यावर पडल्या. अनेक ठिकाणी यामुळं मोठं नुकसान झालं. वृक्षांच्या फांद्या या रिक्षा तसंच इतर वाहनांवर पडल्यामुळं त्यांचं नुकसान झालंच तर काही ठिकाणी झाडं पडल्यामुळे जिवितहानीही झाली. ठाण्यामध्ये तर एक मोठा वृक्ष उन्मळून एका गाडीवर पडल्यामुळे एक डॉक्टर यामध्ये अडकला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी बराच काळ लागला. मोठमोठी झाडं पडल्यामुळं होणारं नुकसान तर मोठं आहेच मात्र ही झाडं उन्मळून पडण्यामागे जेवढं वादळ जबाबदार आहे तेवढ्याच मानव निर्मित समस्याही जबाबदार आहेत. ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर डांबरीकरण आणि कॉन्क्रीटीकरण झालं आहे. याचा फटका या झाडांना अधिक बसला. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला मोठमोठी झाडं होतं. अनेकदा रस्ता रूंदीकरणात ही झाडं रस्त्याच्या मध्ये आली त्याचप्रमाणे डांबरीकरण करताना झाडांच्या बुंध्यांना विशेष जागा ठेवण्यात आली नाही, त्यामुळं मूळं कमजोर होऊन ही झाडं पडली. तसंच अनेक ठिकाणी रस्ता रूंदीकरण झाल्यानंतर झाडं लावली होती. या झाडांना संरक्षण मिळावं म्हणून जाळ्याही लावण्यात आल्या मात्र त्याची योग्य ती दखल न घेतल्याने झाडांचे बुंधे मोठे होऊन हे बुंधे या संरक्षक जाळ्यांमध्ये अडकल्याचे प्रकार पहायला मिळाले. त्याचा फटकाही या वादळात बसला आणि कमजोर झालेली झाडं उन्मळून पडली. खरंतर रस्ता रूंदीकरण करताना झाडांच्या भोवती मोठी जागा ठेवणं आवश्यक आहे. जेणेकरून झाडांचा बुंधा वाढायला मदत होते.मात्र याची दखल कुठेच घेतली गेली नाही. काही अंशानं वास्तुशास्त्रही झाडांच्या पडण्याला कारणीभूत ठरलं. अनेक महत्वाच्या बाजारपेठांमध्ये रस्त्यांवर असलेल्या दुकानांच्या समोर झाड नसावं असं वास्तुशास्त्राचं म्हणणं असल्यामुळं अनेक दुकानदारांनी दुकानासमोर असलेली झाडं या ना त्या कारणाने पडतील अशीच व्यवस्था अप्रत्यक्षपणे केली त्यामुळे त्याचाही फटका या झाडांना बसला. खरंतर पाण्यासाठी झाडं लावणं आवश्यक असताना तोंडाने जरी वृक्षारोपण करण्याचा महिमा गायला जात असला तरी आपल्या घरासमोर आपल्या दारासमोर झाड नको या दृष्टीकोनातूनच पाहिलं जात असल्यामुळं अनेक महत्वाचे रस्ते उघडे-बोडखे झाले आहेत. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे गोखले रोड, बाजारपेठ या ठिकाणी रस्त्याच्या कडेला मोठमोठी झाडं होती. मात्र ही झाडं काही वर्षात जमीनदोस्त झाली. पुन्हा तिथे कधीही झाडं न लावली गेल्यामुळे हे रस्तेही उघडे-बोडखे झाले आहेत. त्यामुळे तौक्ते वादळाबरोबरच मानवनिर्मित चुका झाडं पडण्याला कारणीभूत ठरत आहेत. ठाण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते राजीव दत्ता यांनी ठाण्याच्या पर्यावरणाकडे लक्ष द्यावं याबाबत पालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading