नालेसफाईची सर्व कामे 31 मे पर्यत पूर्ण करण्याचे महापौरांचे आदेश

पावसाळ्यात कोणतीही आपत्ती निर्माण होवू नये यासाठी महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाची पाहणी महापौर नरेश म्हस्के यांनी केली. नुसतेच नाले साफ करुन चालणार नसून नाल्यातील तसेच झोपडपट्टी, चाळींमधील अंतर्गत गटारे साफ करण्याच्या सूचना देत पावसाळ्यात विशेष टीम सज्ज ठेवणे गरजेचे आहे, सध्या 70 टक्के नालेसफाईची कामे झाली असून 31 मे पर्यत 100 टक्के नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे आदेश महापौरांनी दिले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची पाहणी महापौर नरेश म्हस्के यांनी केली. यावेळी ठाणे शहर, वागळे इस्टेट, वर्तकनगर, माजिवडा, वृंदावन, खोपट, वंदना बसस्टॉप, चेंदणी कोळीवाडा आदी परिसरातील नालेसफाईच्या कामांचा आढावा महापौरांनी घेतला. नालेसफाई करताना झोपडपट्टी, चाळी तसेच इमारतीलगतची जी गटारे नाल्याला येवून मिळतात, त्या गटारांची साफसफाई करण्यात यावी, जेणेकरुन चाळींमध्ये पाणी साचणार नाही याकडे लक्ष द्यावे. नाल्यातील काढलेला गाळ हा तसाच न ठेवता तो उचलल्यानंतर ती जागा पाण्याने स्वच्छ करण्यात यावी अन्यथा त्या ठिकाणी पाऊस पडल्यावर चिखल निर्माण होतो आणि त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असते. तसेच काही ठिकाणी नाल्याच्या कमकुवत भिंतीचे काम करणे, तसेच पोकलेन उतरविण्यासाठी तोडण्यात आलेल्या भिंती तातडीने बांधणे पहिल्या पावसात नाल्यातून अनेक वस्तू वाहत येत असतात, या वस्तूंमुळे पाण्याचा प्रवाह अडला जातो, यासाठी पावसात एक विशेष टीम सज्ज ठेवण्यात यावी, जेणेकरुन नाल्यातून वाहून आलेल्या वस्तू या तात्काळ बाहेर काढता येतील व पाण्याचा प्रवाह हा सुरळीत होईल. महापालिकेच्या वतीने नालेसफाईचे काम योग्यपध्दतीने करण्यात येत आहे, परंतु नालेसफाई झाल्यानंतर बहुतांश ठिकाणी नागरिक त्यांच्या जुन्या वस्तू सोफा, गादी, उशा, फर्निचर, थर्माकोलच्या वस्तू टाकत असतात, त्यामुळे नाले तुंबून त्यांच्याच विभागामध्ये पाणी तुंबते आणि याचा नाहक रोष महापालिका तसंच स्थानिक नगरसेवकांवर येतो. तसेच रात्रीच्या वेळी जे नागरिक नाल्यात कचरा फेकतात याबाबत टीम नेमून त्यांच्यावर लक्ष ठेवून दंडात्मक कारवाई करण्याबाबतही महापौरांनी सूचना केली. सध्या नालेसफाईची कामे ही 70 टक्के पूर्ण झाली असून उर्वरित सर्व कामे ही 31 मे पर्यंत 100 टक्के पूर्ण करण्याचे आदेशही महापौरांनी यावेळी प्रशासनाला दिले. या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पुन्हा एकदा पाहणी करणार असल्याचेही महापौरांनी यावेळी नमूद केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading