ठाणे महापालिकेतर्फे ऐतिहासिक अशा महाड मधील चवदार तळ्याच्या स्वच्छतेचं काम सुरू

ठाणे महापालिकेतर्फे महाडमधील चवदार तळ्याच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आलं आहे. चवदार तळ्याचे ऐतिहासिकपण जपण्यासाठी शासनाच्या वतीने या तीर्थक्षेत्राची संपूर्ण स्वच्छता, तलावातील चिखल गाळ काढणे तसेच सुशोभिकरण करणे या कामाला प्राधान्य देवून चवदार तळ्याचे पावित्र्य राखण्यासाठी जे जे करता येईल ते करणार असल्याची ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. येथील चवदार तळ्यातील चिखल आणि गाळ काढण्याच्या कामाची विशेष स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली असून त्या कामाची शिंदे यांनी पाहणी केली. ठाणे महापालिकेचे विशेष पथक चवदार तळ्याच्या स्वच्छतेसाठी कार्यरत आहे. चवदार तळे तसेच बाजूच्या परिसरात पुराच्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने यापूर्वी देखील पथकांमार्फत तेथील स्वच्छता करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत चवदार तळ्यामध्ये गाळ आणि चिखल साचला असून तो गाळ आणि चिखल पूर्णपणे काढणे आवश्यक आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेचा लढा ज्या चवदारतळ्यावरून सुरु केला ते चवदार तळे तमाम आंबेडकरी अनुयायांसाठी एक श्रद्धास्थान आहे. ठाणे महापालिकेचे विशेष पथक या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. या ऐतिहासिक चवदारतळ्यातील चिखल, गाळ काढणे, पाण्याची स्वच्छता तसेच औषध फवारणी करण्याचे काम महापालिकेच्या पथकांमार्फत सुरू करण्यात आले आहे. यासाठी विविध मशिन्ससह महापालिकेचे मनुष्यबळ कार्यरत आहे. महाड परिसरात पुरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या पथकांमार्फत यापूर्वीच जोरदार स्वच्छता मोहीम करण्यात आलेली आहे. महाड शहर स्वच्छ करण्यात ठाणे महापालिकेने मोलाची कामगिरी बजावली आहे. नगरविकास मंत्र्यांनी याबद्दल महापालिकेचं कौतुक केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading